Sandalwood Smuggling: भारताचे 'लाल सोनं' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदनाची खुलेआम तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. बीडमध्ये पोलिसांनी तब्बल दोन कोटी चंदनाचा साठा जप्त केला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात चंदनाचा साठा जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बीड तालुक्यातील बीडच्या केज पोलीस ठाणे अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
चंदन तस्करावरुन अनेक प्रकरणे या पूर्वीही उघडकीस आली आहे. भारतातील तेलंगणा, कर्नाटका या राज्यात मोठ्या प्रमाणात चंदन तस्करीचे रॅकेट चालवले जाते. या विषयावर पुष्पा हा सिनेमाही आला आहे. पुष्पा सिनेमानंतर पुन्हा एकदा चंदन तस्करीचे प्रकरणे समोर आले आहेत. भारताबाहेरी चंदनाला मोठी मागणी आहे. त्यामुळं अधिक किमतीने चंदनाची भारताबाहेरही तस्करी होत असते. महाराष्ट्रातही गेल्या काही दिवसांत चंदनाची होणारी तस्करीचे प्रकरण वाढले आहेत.
बीडच्या केज पोलिसांना गुप्त माहिती मिळताच त्यांनी सिनेस्टाइल सापळा रचून ही कारवाई केली आहे. पोलिसांनी तब्बल 1250 किलो चंदन जप्त केले आहे. या चंदनाची बाजारात किंमत दोन कोटी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन चंदन तस्करांना अटक करण्यात आलं आहे. तर, यातील मास्टरमाइंडचा शोध पोलिसांकडून अद्याप सुरू आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
चंदनाचे प्रामुख्याने भारतात दोन प्रकार आढळतात. एक रक्तचंदन व एक पांढरं चंदन. लाल चंदनाचे झाड हिंदू धर्मात सर्वात पवित्र मानले जाते. पुजा-अर्चा करण्यासाठीही चंदनाचे खोड वापरले जाते. चंदनाच्या खोडात औषधी गुणधर्माबरोबरच नैसर्गिक सुंगध असतो त्यामुळं त्याची किंमत जास्त आहे. सौदर्य वाढवण्यासाठीही चंदनाचा वापर केला जातो. सौंदर्य प्रसाधनांमध्येही चंदनाचा वापर केला जातो. त्यामुळं रक्तचंदनाची मागणी खूप जास्त आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही चंदनाची मागणी जास्त आहे.
महाराष्ट्रात चंदनाची लागवड खूप कमी प्रमाणात केली जाते. आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यात मोठ्या प्रमाणात चंदनाची झाडे आढळतात. रक्तचंदनाची झाडे आंध्र प्रदेश राज्यातील शेषाचलम जंगलात जास्तप्रमाणात आढळतात. तर, महाराष्ट्रात दुष्काळी भागात चंदनाची थोडी फार झाडं आढळतात. कारण चंदनाच्या झाडाला पाण्याचे प्रमाण कमी लागते. विदर्भ, मराठवाड्यात आता चंदनाची शेतीही केली जाते. मात्र, महाराष्ट्रात पांढऱ्या चंदनाची झाडे आढळतात. कारण इथली जमिन लाल चंदनासाठी अनुकुल नाहीये.