सावधान, अतिउत्साही पर्यटन जीवावर बेतायच्या आधीच...

नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात सध्या पर्यटकांची रेलचेल आहे. वळणदार घाट आणि निसर्गरम्य परिसरात अतिउत्साही पर्यटकांमुळे आनंदाला गालबोट लागतंय. अपघातांचं प्रमाण वाढलंय. आठवड्याला दोन बळी जात आहेत. 

Updated: Jul 26, 2017, 04:27 PM IST
सावधान, अतिउत्साही पर्यटन जीवावर बेतायच्या आधीच... title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात सध्या पर्यटकांची रेलचेल आहे. वळणदार घाट आणि निसर्गरम्य परिसरात अतिउत्साही पर्यटकांमुळे आनंदाला गालबोट लागतंय. अपघातांचं प्रमाण वाढलंय. आठवड्याला दोन बळी जात आहेत. 

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर हे दोन जिल्हे पर्यटनासाठी लोकप्रिय ठरलेत. इगतपुरीत विकेंडला दऱ्याखोऱ्यात पर्यटक गर्दी करत आहेत. मुंबई आग्रा महामार्गावर घाटाच्या तोंडाशी असलेली उंच दरी पाहण्यासाठी अनेक जण थांबतात. ही दरी पाहून प्रवासाला निघताना गाडी रिव्हर्स घेण्याच्या नादात सोमवारी एक कार थेट दरीत कोसळली. या अपघातात कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले तर एक मुलगी दगावली. असे अपघात सातत्याने घडतायत. धबधब्याजवळ सातत्याने हे अपघात घडत असल्याचं दिसून येतंय. 

दारू पिऊन धिंगाणा घालणारे पर्यटक, अतिउत्साहात होत असलेलं ध्वनीप्रदूषण, डोंगरदऱ्यात फेकून दिलेलं प्लास्टिक, प्लेट्स, दारूच्या बाटल्या यामुळे प्रदूषण होतंय. काही ठिकाणी उद्दाम पर्यटकांनी मारामाऱ्याही केल्या. तर काही ठिकाणी बेफाम पर्यटकांनी भरधाव गाड्या चालवत अपघात केले. त्यामुळे असे मुजोर पर्यटक आढळल्यास पोलिसांना संपर्क साधण्याचं आवाहन केलं जातंय. तर पर्यटन विभागाने काही ठिकाणी छापे टाकत धाबेही सील केले.

आपली आणि कुटुंबीयांची काळजी घ्या...

- पर्यटनाला जाताना दक्षता घ्या

- अतिउत्साहात जीव धोक्यात घालू नका

- मद्यपान करून डोंगरदऱ्यात, धबधब्यात जाऊ नका

मुंबई पुण्यातले पर्यटक आता कर्जत, लोणावळ्याला कंटाळलेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्याकडे गर्दी व्हायला लागलीय. त्यामुळे पर्यटकांनी अतिउत्साहाला आळा घालायला हवा, तसंच निसर्गाचं पावित्र्यही राखायला हवं