दुधाच्या प्लास्टीक पिशव्यांवरील बंदी एका महिन्यात लागू होणार

 दुधाची पिशवी घेताना ५० पैसे डिपॉझिट घ्यायचे आणि पिशवी परत दिली की ५० पैसे परत द्यायचे ही योजना

Updated: Jun 27, 2019, 11:53 AM IST
दुधाच्या प्लास्टीक पिशव्यांवरील बंदी एका महिन्यात लागू होणार title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : दुधाच्या प्लास्टीक पिशव्यांवरील बंदी एका महिन्यात लागू होईल अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज विधानसभेत दिली. दुधाची पिशवी घेताना ५० पैसे डिपॉझिट घ्यायचे आणि पिशवी परत दिली की ५० पैसे परत द्यायचे ही योजना सर्व दुध कंपन्यांनी मान्य केली आहे. एका महिन्यात हे सुरू होईल अशी माहिती कदम यांनी विधानसभेत दिली. राज्यात दिवसाला १ कोटी दुधाच्या प्लास्टीक पिशव्या रस्त्यावर येतात त्यातून ३१ टन प्लास्टीक कचरा निर्माण होत असल्याचे कदम यांनी सांगितले.

राज्यात प्लास्टीक बंदी लागू झाली मात्र दुधाच्या प्लास्टीक पिशव्यांचा वापर अद्याप सुरू असल्याकडे विधानसभेत काही आमदारांनी पर्यावरण मंत्र्यांचे लक्ष वेधले. विधानसभेत आज प्लास्टीक बंदीबाबतची लक्षवेधी उपस्थित करण्यात आली होती. 

राज्यात १२०० टन प्लॅस्टीक कचरा राज्यात निर्माण होत होता. प्लास्टीक बंदीनंतर यातील ६०० टन प्लॅस्टीक कचरा कमी झाला. राज्यात येणारं प्लास्टीक हे बाहेरील राज्यातून येतं यात गुजरातमधून ८० टक्के प्लास्टीक येतं. ते बंद करण्यासाठी गुजरात सीमेवर प्लास्टीक ट्रकवर आपण स्वतः जाऊन कारवाई केल्याची माहिती कदम यांनी दिली. राज्यात १ लाख २० हजार २८६ टन प्लास्टीक जप्त करण्यात आले असून २४ कंपन्या दिवसाला ५५० टन प्लॅस्टीकवर प्रक्रिया करतात. तर सिमेंट कंपन्यांना ३००० हजार टन प्लास्टीक वापरायला दिले असल्याचे कदम यांनी सांगितले.

या लक्षवेधीवर बोलताना शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी राज्यात अजूनही प्लास्टीकचा सर्रास वापर केला जात असल्याचा दावा केला. तर दुधाच्या पिशव्या ही शहराच्या दृष्टीने एक मोठी समस्या असून सरकार त्याबाबत काय निर्णय घेणार आहे, असा प्रश्न उपस्थित केला होता. तर विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार पर राज्यातून येणारे प्रवासी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक घेऊन येतात. रेल्वेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक येते असल्याचे पर्यावरण मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं.