Badlapur Sexual Assault: बदलापूरमधील आंदोलनामागे नेमकं कोण? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, म्हणाले 'CM शिंदेना ही घटना...'

Badlapur Sexual Assault: बदलापूरमधील लैंगिक अत्याचार घटनेच्या निषेधार्थ 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी हा बंद राजकीय नसून, सर्वांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 22, 2024, 01:23 PM IST
Badlapur Sexual Assault: बदलापूरमधील आंदोलनामागे नेमकं कोण? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, म्हणाले 'CM शिंदेना ही घटना...' title=

Badlapur Sexual Assault: बदलापूरमधील लैंगिक अत्याचार घटनेच्या निषेधार्थ 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हा बंद राजकीय नसून, सर्वांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन केलं आहे. 24 ऑगस्टला महाराष्ट्रातील तमाम जनतेने जात, पात, धर्म बाजूला ठेवून यात सहभागी व्हावं. जर मुलगी शाळेत सुरक्षित नसेल तर शिक्षणाचा अर्थ काय? असा संताप त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूरमधील आंदोलनामागे विरोधक असल्याचा आरोप केला असून, उद्धव ठाकरे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. 

"महाराष्ट्र एका कुटुंबाप्रमाणे एकत्र येऊन करोनाविरोधात लढला होता. तशीच वेळ आली आहे. या विकृतीचा बंदोबस्त करण्यासाठी सर्व बांधवांना, माता भगिनींना मी आवाहन करत आहे. प्रत्येकाच्या मनात आपण नेमकं कसं जगत आहोत याची खंत आहे. शाळेतही मुली सुरक्षित नसतील तर मुलगी शिकली प्रगती झाली याला अर्थ काय. संपूर्ण महाराष्ट्राने व्यक्त होण्याची गरज आहे. राजकारण नव्हे तर माता, भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजेत ही भावना सर्व राजकीय पक्षांची असली पाहिजे. यानंतर पुढील राजकारण येतं," असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.   उद्धव ठाकरेंनी यावेळी वृत्तपत्रांमध्ये महिला अत्याचारासंबंधी छापून आलेल्या काही बातम्या वाचून दाखवल्या.  

पुढे ते म्हणाले की, "गेल्या आठवड्यात बंगालमध्ये असंच कृत्य घडलं यानंतर देशभरात निषेध झाला. निर्भयानंतरही देश खडबडून जागा झाला होता. अशीच ही एक घटना आहे. जेव्हा सहनशीलतेचा अंत होतो तेव्हा उद्रेक होतो. तो क्षण जवळ येत चालला आहे". 

'या बंदमध्ये राजकारण नाही. हा विकृतीचा व्हायरस आहे. कोणीही असं कृत्य करण्याची हिंमत व्हायला नको. जर कोणी केली तर त्याला ताबडतोब कठोर शिक्षा होते ही भीती विकृतांच्या मनात निर्माण कऱण्यासाठी हा बंद करत आहोत. सुरक्षित बहिण ही प्राथमिकता असली पाहिजे. जर बहीण सुरक्षित असेल तर लाडकी बहीण योजना आणता येतात. 24 ऑगस्टला महाराष्ट्रातील तमाम जनतेने जात, पात धर्म बाजूला ठेवावे. जर मुलगी शाळेत सुरक्षित नसेल तर शिक्षणाचा अर्थ काय?", असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. 

"कडेवरच्या मुलांवर अत्याचार झाल्यानंतर ते घाबरुन शांत बसतात. जर अत्याचार उघड झाल्यावर पोलीस शांत बसणार असतील तर जनचेने करायचं काय? हे परवापासून जे घडत आहे तो जनतेचा उद्रेक आहे. त्याला वाचा फो़डण्यासाठी हा 24 ऑगस्टचा बंद करत आहोत. हा बंद कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून माता भगिनींच्या रक्षणासाठी किती जागरुक आहोत हे दाखवण्यासाठी आहे. सर्वांनी हा बंद पाळला पाहिजे," असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे. 

एकनाथ शिंदे यांनी आंदोलनामागे विरोधक असल्याचा आरोप केला आहे असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "निवडणूक डोळ्यामसोर ठेवून राबवलेली ही योजना नव्हती. ठाणे जिल्ह्यात बदलापूर येतं. ही घटना त्यांना मान्य आहे का? हे दुष्कृत्य ते अमान्य करत आहेत? काल मुख्यमंत्री कुठे होते. राज्यभर निषेध होताना रत्नागिरीत लाडक्या बहिणीसाठी हात पसरुन राखी बांधून घेत होते. राखीच्या बंधनाला तरी जागा, किती निर्लज्ज व्हायचं. मुख्यमंत्र्यांनी तसं वाटणं स्वाभाविक आहे. कारण ते घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या अकलेचा दिवाळखोपरणाबद्दल मी बोलणार नाही".

"जनतेचा पैसा जनतेलाच खिरापत म्हणून वाटण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. बदलापूरमधील घटना दुष्कृत्य आणि विकृती असून त्यात राजकारण आणलं असं घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर तेदेखील विकृत आहेत. ते विकृत मानसीकतेचे आहेत. या दुष्कृत्य आणि निषेध करण्यामागे राजकारण आहे असं वाटतंय ते सर्व विकृत आणि नराधमांचे पाठीराखे आहेत असा संताप उद्धव ठाकरेंनी केला. निषेध कऱणं हे राजकारण कधीपासून वाटू लागलं? म्हणजे निषेध पण करायचा नाही का?," अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.