Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din 2024: छत्रपती संभाजी नगरचे हे मिलिंद कॉलेज. तब्बल 74 वर्षानंतरही डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संभाजी नगरचे ऋणानुबंध सांगत डौलानं उभं आहे. 1950 च्या दशकात बाबासाहेब छत्रपती संभाजीनगरला आले होते. त्यावेळी त्यांना इथलं शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण लक्षात आलं. मागासवर्गीय तरुणांना इथं शिक्षणाची संधीच नसल्याचं आंबेडकरांना लक्षात आलं. त्यानंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून इथं एक शैक्षणिक संकुल उभारण्याचं ठरवलं.
केंब्रिज विद्यापीठाच्या धर्तीवर नदीकाठचा परिसर असावा अशी आंबेडकरांची मनोमन इच्छा होती. त्याकाळच्या त्यांच्या एका साथीदारांना खाम नदीच्या किनाऱ्यावरची ही जागा बाबासाहेबांना दाखवली. बाबासाहेबांना ही जागा आवडल्यानंतर त्यांनी 175 एकर जागेवर मिलिंद महाविद्यालय स्थापन झालंय.
इमारत व्हायला वेळ लागणार होता. त्यामुळे सुरुवातीला छावणी भागातील लष्कराच्या बरॅकमध्ये या कॉलेजची सुरूवात झाली. या काळात मिलिंद महाविद्यालयाचा बांधकामही जोरात सुरू होतं. महत्त्वाचं म्हणजे हे बांधकाम चांगलं व्हावं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः इथं तळ ठोकून होते.
मिलिंद कॉलेच्या प्राचार्यपदी बाबासाहेबांनी चिटणीस यांची प्राचार्य म्हणून नेमणूक केली. या महाविद्यालयातील लायब्ररी सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांना वाचताना त्रास होऊ नये म्हणून तळघरात लायब्ररी सुरू केली. या तळघरात बाबासाहेबांनी हाताळलेली अनेक पुस्तक ठेवली आहेत.
बाबासाहेब यांच्या काळातील अनेक वस्तू या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. बाबासाहेबांची गादी, ते आराम करत असलेली खुर्ची, बांधकाम सुरू असताना खूप चालावं लागायचं म्हणून त्यांच्यासाठी तयार केलेली डोली . तसेच त्यांनी वापरलेली भांडीकुंडी हे सगळं या ठिकाणी जतन करून ठेवलंय. मागासलेपण दूर करण्यासाठी शिक्षणाचा महत्वाचा वाटा असल्यानं आंबेडकरांनी या भागात महाविद्यालय सुरू केले. विशेष म्हणजे बाबासाहेबांनी सुरू केलेल्या मिलिंद महाविद्यालयाचा दबदबा आजही कायम आहे.