पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार पडली. दरम्यान मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच महापूजा होती.
मुख्यमंत्र्यांनी सहकुटूंब आणि सपत्निक पहाटे विठ्ठलाची पूजा केली. मुख्यमंत्र्यांसोबत मुरली भगवान नवले आणि जिजाबाई मुरली नवले या वारकरी दाम्पत्याला यंदा विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळाला. नवले दाम्पत्य गेली 20 वर्षे वारी करत आहेत. शेतकरी असलेलं नवले दाम्पत्य यावर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत पायी आले आहेत.
यंदा राज्यभरात चांगल्या पावसाला सुरुवात झालेली असल्याने सगळीकडे पेरण्या सुरू झाल्या आहेत. काहीसा उशिरा का होईना पण राज्यातील शेतकरी सुखावला आहे. हा पाऊस असाच कायम राहून सगळीकडे उत्तम पीकपाणी येऊ देत तसेच राज्यातील बळीराजा सुजलाम सुफलाम होऊ देत हीच मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी पांडुरंगाच्या चरणी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावावर या निमित्ताने एक अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. चार पिढ्यांसोबत विठ्ठलाची महापूजा करणारे ते पहिलेच मुख्यमंत्री आहेत. विठ्ठलाच्या महापूजेवेळी त्यांच्यासोबत वडिल, मुलगा आणि नातूही होता.
आषाढी एकादशीनिमित्त आज पंढरपूरमध्ये लाखो वरकऱ्यांनी गर्दी केली आहे. आळंदी आणि देहूवरून निघालेल्या ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या पालख्यांसोबत लाखो वारकरी पायी चालत विठुरायाच्या भेटीची आस मनामध्ये पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत.
पहाटेपासूनच वारकऱ्यानी चंद्रभागेमध्ये स्नान करायला सुरुवात केली आहे. स्नान आटोपल्यानंतर भाविक नामदेव पायरीचे दर्शन घेऊन विठ्ठलाच्या दर्शनासाठी पुढे जातायत.