Shirur Loksabha : 'माझा बदला घेण्यासाठी जर...', अमोल कोल्हेंची आढळराव पाटलांवर बोचरी टीका

Shirur Lok sabha Election 2024 : शिरूर लोकसभेच्या जागेवर अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील (Amol Kolhe vs Shivajirao Adhalrao patil) अशी थेट लढत होणार आहे. अशातच अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांवर निशाणा लगावलाय.

सौरभ तळेकर | Updated: Mar 23, 2024, 08:04 PM IST
Shirur Loksabha : 'माझा बदला घेण्यासाठी जर...', अमोल कोल्हेंची आढळराव पाटलांवर बोचरी टीका title=
Amol Kolhe, Shivajirao Adhalrao patil, Shirur Loksabha

Amol Kolhe On Adhalrao patil : गेल्या पाच वर्षात राज्याच्या राजकारणात मोठी उलटापालट झाल्याने आता नेत्यांची पळापळ सुरू असल्याचं पहायला मिळतंय. राजकीय पक्षात गट निर्माण झाल्यानंतर आता नेत्यांना लोकसभेच्या तिकीटासाठी पक्षांतर करावं लागतंय. अशातच आता येत्या 26 तारखेला शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao patil) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करत आहेत. आढळराव पाटलांच्या या निर्णयावर आता अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी टीका केली आहे.  2019 चा बदला घेण्यासाठी जर आढळराव निवडणूक लढणार असतील तर सामान्य लोकांनी लोकसभेत जाऊ नये का? असा सवाल अमोल कोल्हे यांनी विचारला आहे.

काय म्हणाले अमोल कोल्हे?

शिवाजीराव आढळराव पाटील 2019 चा बदला घेण्यासाठी निवडणूक लढणार असतील तर, माझा प्रश्न आहे की, एका सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलाने लोकसभेत जाऊच नये का? का फक्त परदेशात कंपन्या असणाऱ्याच माणसाला लोकसभेत जाण्याचा अधिकार आहे? हा प्रश्न माझ्या मनात येतो, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांना टोला लगावला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे निवडणुकीला सामोर जाण्याचा कोणाचा काय हेतू आहे, हे ही स्पष्ट होतंय, असंही कोल्हे म्हणाले.

आढळरावांचं विधान पाहिलं तर त्यांना 2019 चा बदला घ्यायचा आहे. मला मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, सर्वसामान्य नागरिकांचा, महाराष्ट्रातील जनतेचा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आवाज हा दिल्लीत घुमत राहावा यासाठी मायबाप जनतेकडे मी आशिर्वाद मागतोय. त्यासाठी मी या निवडणुकीत उभा आहे. त्यांना जर बदला वाटत असेल तर मायबाप जनता सुज्ञ आहे, असंही अमोल कोल्हे यांनी यावेळी म्हटलं आहे. त्यावेळी अमोल कोल्हे यांनी राज ठाकरेंच्या महायुतीच्या प्रवेशावर देखील भाष्य केलं.

कोणी महायुतीत जाण हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण यापद्धतीने जे प्रकार सुरु आहेत त्यामध्ये भाजपचा कॉन्फिडन्स खचलेला दिसतोय. अब की बार 400 पार म्हणणं असताना जेमतेम ते 200 चा आकडा ते गाठू शकतील अशी वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्राची भूमिका ही फार महत्वाची राहणार आहे. एकीकडे शिवसेना फोडून झाली, राष्ट्रवादी फोडून झाली तरी सुद्धा मनसेला बरोबर घेताय, तरी सुद्धा परिस्थिती भाजपला फेव्हरेबल अशी नाहीये, असं अमोल कोल्हे म्हणतात. महाराष्ट्र हा कायम विचारांच्या मागे उभा राहिला आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा येत्या निवडणुकीत नक्की दिसेल, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी दंड थोपटले आहेत.

शिरूरचं राजकीय गणित

2009 मध्ये शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटलांनी (Shivajirao Adhalrao Patil) राष्ट्रवादीच्या विलास लांडेंचा पावणे दोन लाखांनी पराभव केला. 2014 मध्ये पुन्हा एकदा आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीच्या देवदत्त निकमांना तब्बल 3 लाखांनी पराभवाचं पाणी पाजलं. मात्र 2019 मध्ये राष्ट्रवादीनं टीव्हीच्या पडद्यावर छत्रपती संभाजीराजेंची भूमिका साकारणारे ख्यातनाम अभिनेते डॉ. अमोल कोल्हेंना (Amol Kolhe) उमेदवारी दिली. त्यांनी आढळरावांचा 58 हजार मतांनी पाडाव केला आणि अगदी मोदी लाटेतही शिरूरचा गड जिंकला. शिरुर लोकसभा मतदारसंघात शिरुर, खेड - आळंदी, जुन्नर, आंबेगाव, हडपसर आणि भोसरी हे 6 विधानसभा मतदारसंघ येतात.  2019 साली भोसरीचा अपवाद वगळता 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचेच आमदार निवडून आले.