Sanjay Raut ED : संजय राऊतानंतर शिवसेनेचे कोणते नेते ED च्या रडारवर ?

 हे नेते कोण आहेत आणि कोणत्या प्रकरणात त्यांच्यामागे ईडी लागली आहे , हे जाणून घेऊयात.  

Updated: Jul 31, 2022, 10:50 AM IST
Sanjay Raut ED : संजय राऊतानंतर शिवसेनेचे कोणते नेते ED च्या रडारवर ? title=

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी ईडीने धाड टाकली आहे. पत्राचाळ प्रकरणात त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. तसेच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.  संजय राऊता व्यतिरीक्त असे अनेक शिवसेनेचे नेते आहेत ज्यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे.  हे नेते कोण आहेत आणि कोणत्या प्रकरणात त्यांच्यामागे ईडी लागली आहे , हे जाणून घेऊयात.  

प्रताप सरनाईक

शिवसेना नेते प्रताप सरनाईक (Pratap sarnaik) यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. पीएमएलए अॅक्ट (PMPL) अंतर्गत सरनाईक यांची 11 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने ठाण्यातील सरनाईक यांच्या दोन फ्लॅट आणि मालमत्ता पीएमएलए अॅक्ट अंतर्गत जप्त केली, असून याची किंमत 11.35 कोटी आहे. 22 मार्च 2022 रोजी ही कारवाई करण्यात आली.  या प्रकरणाचा अजून तपास सुरु आहे.  

भावना गवळी
शिवसेना खासदार भावना गवळी गेल्या वर्षभरापासून सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. ‘ईडी’कडून त्यांना चौकशीसाठी चार वेळा समन्स बजावण्यात आले होते. मात्र, त्या चौकशीसाठी उपस्थित राहिल्या नाहीत. दरम्यान, भावना गवळी यांच्यावर जनशिक्षण संस्था व महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आहे. ‘ईडी’ने सप्टेंबर महिन्यात गवळी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यानंतर या प्रकरणात सईद खान याला अटक केली. त्याची मालमत्ता देखील जप्त केली. भावना गवळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध कंपन्या स्थापन करून १०० कोटींचा घोटाळा केला व ५५ कोटींचा बालाजी पार्टीकल बोर्ड हा कारखाना २५ लाख रुपयात घेतला, असा आरोप, सोमय्या यांनी केला होता. 

यशवंत जाधव 

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांची पत्नी  आमदार यामिनी जाधव हेदेखील केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आहेत.ईडीने यशवंत जाधव यांच्या कुटुंबाच्या मालिकीच्या दुबईतील कंपनीची चौकशी सुरू केली आहे. संबंधित कंपनी जाधव कुटुंबियांकडून 2018 साली स्थापन केली होती. त्याच वर्षी ते मुंबई महापालिकेच्या स्थानी समितीचे अध्यक्ष होते. ही कंपनी स्थापन करताना FEMA कायद्याच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे.

जाधव यांनी स्थापन केलेल्या कंपनीच्या खात्यात कोरोनाच्या काळात पाच कोटी रुपये जमा करम्यात आले होते. यातील अर्धी रक्कम रोख स्वरुपात जमा करण्यात आली होती. या प्रकरणी ईडीने जाधव आणि त्यांच्या दोन मुलांना समन्स बजावले होते. ईडीच्या समन्सकडे जाधव यांनी पाठ फिरवली पण त्यांच्या एका मुलाने ईडीकडे जाब नोंदवलाय. 

आनंदराव अडसूळ 
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ हे देखील ईडीच्या रडारवर आहेत. त्यांना  ईडीने समन्स बजावले होते.  सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी आमदार रवी राणा यांनी ईडीकडे अडसूळांविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अडसुळ यांना ईडीने समन्स बजावले होते.

सीटी बँकेमध्ये कामगार, पेंशनधारक, ९९ टक्के मराठी लोकांची खाती होती. त्यातील जवळपास ९ हजार खातेधारक होतो. त्या बँकेतील खातेदारांचे पैसे अवैधरित्या बिल्डरांना वाटण्यात आले. त्यात अडसूळांनी २० टक्के कमिशन घेतले. त्यामुळं बँक पूर्ण बुडाली. यामध्ये जवळपास ९८० कोटींचा घोटाळा झाला आहे, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे.

अनिल परब 
 राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब ईडीच्या रडारवर आहेत. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी एनआयए कोर्टाला लिहीलेल्या पत्रात अनिल परबांवर खंडणी वसूल करण्याचे आरोप करण्यात आले आहेत. त्याशिवाय दापोली येथील रिसॉर्टच्या बांधकाम प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे. अनिल परब परिवहन मंत्री असताना त्यांच्या शासकीय आणि खासगी निवासस्थानी ईडीने छापा मारला होता. जवळपास 10 ते 12 तास चौकशीही केली होती. 

अर्जुन खोतकर 
 अर्जुन खोतकर सभापती असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ED कडून चौकशी सुरू आहे. दहा हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांची जमीन अर्जुन खोतकर यांनी हडप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. काही दिवसांपूर्वीच खोतकर यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली होती. काही कारणास्तव, अडचणींमुळे आपण एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत असल्याचे सांगितले.