Thackeray Group BMC Morcha: ठाकरे गटाने मुंबई महापालिकेवरचा धडक मोर्चा काढला. उद्धव ठाकरे या मोर्चात सामील झालेले नाहीत, आदित्य ठाकरेंच्या नेतृत्त्वात हा मोर्चा मुंबई महापालिकेवर धडकला. मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात भ्रष्टाचाराची पोलखोल केली. खोके सरकारच्या घोटाळ्यांची फाईल तयार आहे. 'ज्या दिवशी आमचं सरकार येईल त्या दिवशी जागा दाखवू' अस ओपन चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारला दिले आहे.
मुंबई महानगरपालिकेची वास्तू अत्यंत महत्वाची आहे. देशाचे अर्थ चक्र येथून चालते. BMC देशाचे शक्तीपीठ आहे. देशाचे अर्थकारण, राजकारण येथूनच चालते. एक वर्ष झालं मुंबई महापालिकेत नगरसेवक नाही. महापौर नाही. BMC मध्ये प्रशासन बसला आहे. तो फक्त शिंदे सरकारचे फोन घेतो. बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरसाठी रेड कार्पेट घातले जाते. निवडणुका न झाल्यामुळे मुंबईची कामे थांबली आहेत.
आम्ही काढलेल्या घोटाळ्यांची चौकशी झाली पाहिजे अशी विनंती आम्ही नविन राज्यपालांकडे केली आहे. मुंबईवर ST लावली तशी, ठाणे, नाशिकसह घोटाळ्यांचे आरोप झालेल्या महापालिकांवर लावा. एवढ नीच राजकारण कधीच पाहिले नाही. नुसतं फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. सरकार नुसते घोटाळे करत आहे. सर्वसामान्यांच्या पैशातून घोटाळा केला जात आहे. तुमच्या घोटाळ्यांच्या फाईल बनल्या आहेत. ज्या दिवशी आमचं सरकार येणार त्यादिवशी तुम्हाला आत टाकणार. ही मुंबई आमची. मुंबईकरांची मुंबई आहे. महाराष्ट्राची मुंबई आहे. आमची मुंबई लुटू नका असं आदित्य ठाकरे म्हणाले.
मेट्रो सिनेमा ते मुंबई महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा काढण्यात आलाय. 23 अटी-शर्तींसह पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली. लाखो शिवसैनिक या मोर्चात सामील झाले होते. तर हिंमत असेल तर आता निवडणुका घ्या, मग कोण चोर कुणाचा आणि शोर कुणाचा ते समजेल असं आव्हान संजय राऊतांनी दिले.