आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण : पैसा कोणाला नको असतो? रस्त्यात 10 रुपयांची पडलेली नोटही खिशात टाकण्याचा मोह अनेकांना होतो. पण कल्याणमध्ये रस्त्यावर झाडु विकणाऱ्या एका महिलेनं लाखमोलाचा प्रामाणिकपणा दाखवला आहे. या महिलेच्या कृतीमुळे समाजात आजही प्रामाणिकपणा शिल्लक आहे याचा प्रत्यय पाहिला मिळाला.
कल्याण पश्चिमेकडील रामबाग परिसरात 60 वर्षीय जाहिदा शेख ही महिला आपल्या कुटुंबासह राहते. कल्याण एसीपी कार्यलयाजवळ जाहिदा शेख या झाडू सुपड्या ,गाळण्या सह प्लास्टिकचं सामान विकून आपला उदरनिर्वाह करते. तिच्या दुकानासमोरच तिला एक सोन्याचं ब्रेसलेट सापडलं. या ब्रेसलेटची किंमत तब्बल 2 लाख रुपये इतकी होती.
पण हे ब्रेसलेट स्वतः जवळ ठेवण्याचा मोह तिला झाला नाही कारण तिच्यातला प्रामाणिकपणा जागृत होता. हरवलेले ब्रेसलेट तीने संबंधित इसमाला परत करत आजही या जगात प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचं दर्शन घडवलं.
पोलिसांना दिली माहिती
सोन्याचं ब्रेसलेट सापडल्यानंतर जाहिदाने तात्काळ तिथे असेल्या वाहतूक पोलिसांना हि माहिती दिली. त्यानंतर तासाभराने एक तरुण ब्रेसलेट शोधण्यासाठी तिथे आला. त्याने आजूबाजूला विचारपूस केली. यावेळी जाहिदाने त्या तरुणाला ब्रेसलेट पोलिसांकडे सोपवल्याची माहिती दिली. या तरुणाने पोलिसांची संपर्क साधला.
प्रामाणिकपणाचा सत्कार
पोलिसांनी शहानिशा करत हे ब्रेसलेट यात तरुणाचं आहे याची खातरजमा करत सोन्यांच ब्रेसलेट त्या तरुणाच्या स्वाधिन केलं. महागडं ब्रेसलेट परत मिळाल्याचा आनंद या तरुणाच्या चेहऱ्यावर दिसत होता. जहिदा शेख यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी तिचा सत्कार केला.