HSC Exam 2023: अ‍ॅब्युलन्स मधून आली, वर्गातच सलाईन लावले आणि... बारावीची परीक्षा देणाऱ्या मुलीच्या जिद्दीला सलाम!

HSC Exam 2023 : आजारी असताना वर्ष वाया जावू नये यासाठी मुलीने बारावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. केवळ प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अ‍ॅब्युलन्स मधून ती परीक्षा केंद्रावर आली आणि तीने परीक्षा देखील दिली. 

Updated: Mar 1, 2023, 10:27 PM IST
HSC Exam 2023: अ‍ॅब्युलन्स मधून आली, वर्गातच सलाईन लावले आणि... बारावीची परीक्षा देणाऱ्या मुलीच्या जिद्दीला सलाम! title=

सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर : आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर अशक्य गोष्टी ही साध्य करता येवू शकते. बारीवीची परीक्षा (HSC Exam 2023)देणाऱ्या पंढरपूर (Pandharpur) येथील एका विद्यार्थीनीने हे सिद्ध करुन दाखवले आहे. रुग्णालयात दाखल असताना ही विद्यार्थीनी अ‍ॅब्युलन्स मधून परीक्षा केंद्रावर आली. वर्गातच सलाईन लावून या विद्यार्थीनीने बारावीची परीक्षा दिली. या मुलीची प्रबळ इच्छाशक्ती पाहून शिक्षकांसह सगळेचजण हैराण झाले आहेत.   

बारावीच वर्ष हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात करिअरला कलाटणी देणारे असते.  यामुळेच करमाळयात एका विद्यार्थिनीने चक्क सलाईन लावून आपला पेपर दिला आहे. प्रेरणा बाबर असे या विद्यार्थीनीचे नाव आहे. प्रेरमा करमाळा शहरात यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची विद्यार्थीनी आहे. आजारी असताना प्रेरणाने बारावीची परीक्षा देण्याचा निश्चय मनाशी ठाम केला. 1मार्च रोजी रसायन शास्त्र विषयाची परीक्षा होती. हा पेपर बुडू नये म्हणून नातेवाईकांच्या मदतीने प्रेरणा अ‍ॅब्युलन्स मधून परीक्षा केंद्रावर दाखल झाली.

प्रेरणा आजारी असताना परीक्षा देण्यासाठीची तिची धडपड पाहून परीक्षा केंद्रावर केंद्र संचालकांनी तिच्यासाठी व्यवस्था केली. तिथेच तिला सलाईन लावली. कसलाही त्रास न होता तिने वेळेत पेपर पूर्ण केला . बारावीचे वर्ष महत्वाचे आहे. या वर्षाचे पेपर चुकवायचे नाहीत म्हणून तिने हा प्रयत्न केला.

आईने लेकराला वडिलांजवळ ठेवून  दिली बारावीची परीक्षा

हिंगोलीत एका मातेने सात महिन्यांच्या तान्हुल्याला तीन तास परीक्षा केंद्राबाहेर ठेऊन बारावीचा पेपर सोडवला. या दरम्यान तिचा पती बाळाचा सांभाळ करीत होता. तळपत्या उन्हात साडीचा झोका करून बाळाला या झोळीतच झोपवले. पुनम माधव इंगोले असे या आईचे नाव आहे. पूनम या परभणीच्या आहेत. सेनगाव तालुक्यातील केंद्रा बुद्रुक येथील परीक्षा केंद्रावर त्या परीक्षा देण्यासाठी गेल्या होत्या. हे परीक्षा केंद्र घरापासून फार दूर असल्याने बाळाला घरी ठेवून जाणे शक्य नव्हते. यामुळे त्या बाळाला सोबत घेवून परीक्षा केंद्रावर गेल्या. तिचे पती देखील तिच्या सोबत गेले. पत्नी परीक्षा देत असताना तीन तास त्यांनी बाळाचा सांभाळ केला.  या जोडप्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.