कोल्हापुरात पुजाऱ्यासह मंदिर विहिरीत कोसळलं, 64 वर्षीय कृष्णात दांगट यांचा मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यातील गडमुडशिंगे येथे मंदिर विहिरीत कोसळून दुर्घटना झाली आहे. मंदिरासह पूजेसाठी आलेला पुजारीही विहिरीत कोसळला असून, मृत्यू झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 20, 2024, 02:47 PM IST
कोल्हापुरात पुजाऱ्यासह मंदिर विहिरीत कोसळलं, 64 वर्षीय कृष्णात दांगट यांचा मृत्यू title=

कोल्हापुरात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. सतत पडत असणाऱ्या पावसामुळे काही ठिकाणी भिंती पडण्याच्या देखील घटना घडल्या आहेत. अशीच एक दुर्घटना कोल्हापुरातल्या गडमुडशिंगी गावात घडली आहे. विहिरीच्या काठावर असणाऱ्या जुनं नरसिंह मंदिर विहिरीत कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मंदिरात पूजा करण्यासाठी बसलेले कृष्णात उमराव दांगटही (वर्षे 65 दांगट मळा, गडमुडशिंगी) कोसळले. त्यामुळे पुजाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

कोल्हापुरातील गडमुडशिंगी येथे विहिरीच्या काठावर 20 वर्षापूर्वी एक छोटं नरसिंह मंदिर उभारण्यात आलं होतं. कृष्णात उमराव दांगट आणि त्यांचं कुटुंबीय हे रोज नित्यनियमाने पूजा करीत असत. रोजच्या प्रमाणे आज सकाळी कृष्णा दांगट हे पूजेसाठी मंदिरात दाखल झाले. पूजा सुरू असतानाच अचानक हे मंदिर त्यांच्यासह विहिरीत कोसळल. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी विहीर परिसरात पोहोचून कृष्णा दांगट यांचा शोध सुरू केला, पण कृष्णा दांगट दिसून आले नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना घटनेची वर्दी दिली. 

यानंतर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे पथक पथक दाखल झाले. या पथकाने विहिरीत कृष्णा दांगट याची शोध मोहीम घेतली. त्यावेळी या दुर्घटनेत कृष्णात उमराव दांगट यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे सामोर आलं. विहिरी भोवती असणारी माती ढिसूळ झाल्यामुळे मंदिर कोसळल्याचं सांगितलं जात आहे. नित्यनियमाने नरसिंह देवाची पूजा अर्चा करणाऱ्या कृष्णा दांगट याचा अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Tags: