सिंधुदुर्गातील (Sindhudurg) मालवण (Malvan) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळल्यानंतर संपूर्ण राज्यभरात पडसाद उमटत आहेत. साताऱ्यात (Satara) एका तरुणाने चक्क तीन किमीपर्यंत नाक घासत आंदोलन केलं आहे. यावेळी त्याने आंदोलन करताना हातात 'महाराज आम्हाला माफ करा' असं बॅनर घेतलं होतं. पोलिसंनी नंतर आंदोलकांना ताब्यात घेतलं.
साताऱ्यातील माण येथील महेश करचे या तरुणाने महाराज आमची चूक झाली असं म्हणत कराड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळापर्यंत तीन किलोमीटर नाक घासत आंदोलन केलं. या आंदोलनामध्ये त्यांनी विविध फलक लावले होते. आंदोलकांनी हातात बॅनर घेऊन महाराज आम्हाला माफ करा अशा घोषणा दिल्या. या आंदोलकांना नंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच व्यक्त झाले असून त्यांनी जाहीर माफी मागितली आहे. तसंच ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत त्यांचीही माफी मागितली आहे. "मला आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. 2013 मध्ये जेव्हा भाजपाने मला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून निश्चित केलं तेव्हा मी सर्वात आधी रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर बसून प्रार्थना केली होती. एक भक्त आपल्या आराध्य दैवताला जशी प्रार्थना करतो त्याच भक्तीभावाने आशीर्वाद घेत राष्ट्रसेवेच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली होती," असं नरेंद्र मोदी म्हणाले.
पुढे त्यांनी सांगितलं, "काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात जे झालं ते दुर्दैवी आहे. माझ्यासाठी, माझ्या सर्व सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज फक्त नाव किंवा राजा महाराजा नाहीत तर आराध्य दैवत आहेत. मी आज मान झुकवून आराध्य दैवत शिवाजी महाराजांच्या चरणावर नतमस्तक होऊन माफी मागतो. आमचे संस्कार वेगळे आहेत".
"आमचे संस्कार वीर सावरकरांना शिव्या देणाऱ्यांसारखे नाही. ते सतत सावरकरांचा अपमान करतात. देशभावना पायदळी तुडवतात. वीर सावकरांना शिव्या दिल्यानंतरही माफी मागण्यास जे तयार नाहीत, न्यायालयात जाऊन लढाई लढण्यास तयार आहेत, ज्यांना पश्चाताप होत नाही महाराष्ट्राच्या जनतेने त्यांचे संस्कार समजून घ्यावेत. मी येथे आल्यावर महाराजंच्या चरणावर नतमस्तक होऊन माफी मागण्याचं काम करत आहे. इतकंच नाही जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानतात त्यांच्या मनाला ज्या वेदना झाल्या आहेत त्यांचीही मान झुकवून माफी मागतो. माझे संस्कार वेगळे आहेत. आमच्यासाठी आराध्य दैवतापेक्षा कोणी मोठं नाही," असंही नरेंद्र मोदी म्हणाले.