'मला येथून पळावं लागेल...', पुण्यात दक्षिण कोरियन व्लॉगरला घेरुन गैरवर्तन, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दक्षिण कोरियन व्लॉगर पुण्यात फिरत असताना आरोपीने तिच्या गळ्यात हात टाकत गैरवर्तन केलं होतं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त होऊ लागला होता. यानंतर अखेर कारवाई करण्यात आली आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 20, 2023, 11:55 AM IST
'मला येथून पळावं लागेल...', पुण्यात दक्षिण कोरियन व्लॉगरला घेरुन गैरवर्तन, पोलिसांनी ठोकल्या बेड्या  title=

पुण्यात दक्षिण कोरियन व्लॉगरशी अंगलट करत गैरवर्तन करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात दिवाळीमध्ये हा प्रकार घडला होता. केली नावाची ही व्लॉगर पिंपरी चिंचवडमधील रावेत भागात व्हिडीओ रेकॉर्ड करत असताना तिच्याशी गैरवर्तन करण्यात आलं होतं. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. 

सहायक पोलिस आयुक्त सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार,  व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. व्हिडीओत, आरोपी केळीच्या गळ्यात बिधास्तपणे हात घालताना दिसत आहे. यादरम्यान केली स्थानिकांशी संवाद साधत असताना आरोपी निर्धास्तपणे तिच्या गळ्यात हात घालून इतरांनाही असंच वर्तन करण्यासाठी उकसवत होता. 

पिंपरी चिंचवडच्या क्राइम ब्रांच पोलिसांनी रावेत भागात आरोपीचा शोध घेतला आणि मंगळवारी अटक केली. 

व्हिडीओच्या सुरुवातीला केली रावेतमधील एका दुकानाबाहेर नारळपाणी पित संवाद साधताना दिसत आहे. यादरम्यान अचानक एक व्यक्ती तिथे येतो आणि गळ्यात हात घालतो. दुसरा व्यक्ती तिथे आला असता तो आरोपी अजून जवळ येण्यास सांगतो. केली दूर जाण्याचा प्रयत्न करत असतानाही आरोपी तिला त्रास देतो. यामुळे केली थोडी अस्वस्थ होते आणि तेथून निघून जाते. मला येथून आता पळावं लागेल असं ती व्हिडीओत सांगते. या लोकांना मिठ्या मारायला फारच आवडतं असंही ती म्हणते. 

केलीचे युट्यूबला 1 लाख 69 हजारांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने एकटी तरुणी भारत भ्रमण करत असल्याचं लिहिलं आहे. तिने हा व्हिडीओ तिच्या चॅनेलवर शेअर केला आहे. तुम्ही भ्रमण करत असताना काही चुकीचे लोकही भेटू शकतात असं तिने म्हटलं आहे. तसंच काही लोकांच्या चुकीच्या वर्तनावरुन तुम्ही भारताबद्दल मत निर्माण करु नका असं आवाहनही तिने केलं आहे. 

 

गतवर्षी मुंबईत एका दक्षिण कोरियन व्लॉगरचा छळ केल्याप्रकरणी दोघांना अटक केली होती.