चंद्रपूर, नाशिक, मुंबई : दारुला महिलांची नावे द्या म्हणजे खप वाढेल, या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विधानाविरोधात मूल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेय. दारुबंदी आंदोलनातील प्रमुख कार्यकर्त्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी ही तक्रार दाखल केलेय. महिलावर्गाचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी तक्रार करताना केलाय.
भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या दारु संदर्भातील वक्तव्यावरुन आता विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. मंत्री गिरीश महाजन यांनी कदाचित रात्री घेतली असावी त्यामुळं ते महिलेचे नाव ठेवा, असे सांगत आहे, अशी टीका ही राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलीक यांनी केली.
दरम्यान, काँग्रेसनेही हल्लाबोल चढवलाय. उस्मानाबाद येथे झालेल्या काँग्रेसच्या जनआक्रोश मेळाव्यात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली. दारूच्या बाटलीला महिलेचे नाव द्या म्हणजे दारुचा खप वाढेल अशा पद्धतीचे वक्तव्य सरकारमधील मंत्री जर करीत असतील तर त्यांच्या अकलेची कीव येत असल्याची टीका चव्हाण यांनी केली.
दारुच्या ब्रँडला महिलेचे नाव द्या मग बघा कसा खप वाढतो, असे वक्तव्य करत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी चांगलाच वाद ओढवून घेतलाय. नंदूरबारमध्ये सातपुडा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या वेळी ते बोलत होते. ‘भिंगरी’ ‘ज्युली' ‘बॉबी’ असल्या नावांची दारु चांगली खपते. तुम्ही उत्पादन करत असलेल्या दारुचे नाव महाराजा आहे मग कसे काय जमेल? त्या दारुचे नाव महाराणी करा मग बघा कसा खप वाढतो ,असे गिरीश महाजन यांनी म्हटले होते.
दरम्यान, आपल्या वक्तव्यावरुन वाद ओढवल्याचे लक्षात येताच गिरीश महाजन यांनी आपण हे सगळे विनोदाने म्हटले होते, असे सांगत सारवासारव केली. मात्र, विरोधकांकडून महाजन यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. तर महिला वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.