Mumbai Crime News: एका सहा वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुलुंड येथील शंकर टेकडी परिसरात ही घटना घडली आहे. घराबाहेर खेळत असतानाच त्याच्यावर मृत्यू ओढावला आहे. अंकुश भंडारे असं या सहा वर्षांच्या चिमुकल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुश भंडारे हा घराबाहेर त्यांच्या पाळीव मांजरीसोबत खेळत होता. त्याचवेळी मांजरीच्या मागे पळता पळता तो घरापासून दूर गेला. त्याचवेळी मांजरीसोबत खेळता खेळता अचानक त्याचा हात ता विजेच्या तारेला लागला. विद्युत तारेला हात लागल्याने त्याला जोराचा शॉक लागला.
शॉक लागल्याने तो जागीच खाली कोसळला. अंकुशचा आवाज ऐकून त्याचे आई-वडिल आवाजाच्या दिशेने धावले तेव्हा अंकुश जमिनीवर खाली कोसळला होता. मुलाला असे निपचित पडलेले पाहून त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्यानंतर तातडीने त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथेही त्याने उपचारांना प्रतिसाद न दिल्याने आणि त्याची परिस्थिती अधिक गंभीर झाल्यामुळं त्याला मुलुंडमधील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
दुसऱ्या रुग्णालयात दाखल केल्यानंतरही त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. परिसरात असलेल्या उघड्या विजेच्या तारांमुळं सहा वर्षांच्या अंकुशचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसंत, महावितरण्याचा भोंगळ कारभारामुळं एका मुलाला जीवाला मुकावे लागले आहे, असा आरोप करत परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
डोंबिवली मानपाडा पोलिसांनी दोन सराईत चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. तपासात या आरोपींकडून तब्बल नऊ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. डोंबिवलीच्या डी मार्ट परिसरामध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्या रवी गवळी यांची दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सोनसाखळी चोरून धक्का देत पळ काढला. यात रवी हे जखमी झाले. त्यांनी या प्रकरणी डोंबिवली मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी हे नवी मुंबई मार्गे डोंबिवलीला येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी साध्या वेशात सापळा रचून या आरोपींना ताब्यात घेतले. यावेळी आरोपींनी पोलिसांच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. वासिर खान आणि मोहम्मद कुरेशी असा अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. त्यांच्याकडून डोंबिवली कल्याण या भागातील विविध नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.दोघांकडून एकूण नऊ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.