'अशा आंदोलनांचा इतिहास लक्षात घेता काही...'; मराठी अभिनेत्याचा जरांगे-पाटलांना पाठिंबा

Marathi Actor Joins Maratha Protest Praises Manjo Jarange Patil: योग्य ठिकाणी, योग्य गोष्टीचा वापर करत पुढं जाऊया. उतावळेपना करायच्या आधी कुटूंबाचा विचार करा, असं आवाहनही या अभिनेत्याने मराठा समाजातील तरुणांना केलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 30, 2023, 03:41 PM IST
'अशा आंदोलनांचा इतिहास लक्षात घेता काही...'; मराठी अभिनेत्याचा जरांगे-पाटलांना पाठिंबा title=
सोशल मीडियावरुन आपल्या भावाना त्यांनी व्यक्त केल्या आहेत

Marathi Actor Joins Maratha Protest Praises Manjo Jarange Patil: राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे-पाटील मागील 6 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. जालन्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली सराटी येथे आणरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे-पाटील आज स्टेजवरच कोसळले. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांच्या आग्रहास्तव आज पाणी प्यायलं. एकीकडे हा लढा सुरु असतानाच एक मराठी अभिनेता या आंदोलनातील साखळी उपोषणात सहभागी झालेल्या आंदोलकांबरोबर काही वेळ आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झाला. त्यानेच यासंदर्भातील फोटो शेअर केले आहेत. 

एक सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो

मराठी मालिकांमधील अभिनेते किरण माने यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून मनोज जरांगेचं कौतुक केलं आहे. "जरांगे पाटील... या देशात एक सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो, हे तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलंय. खरंतर असं पूर्वी घडणं सहज शक्य होतं. कारण व्यवस्थेला संविधानाचा धाक असण्याचा तो काळ होता. आजच्या भवतालात, संविधान गुंडाळू पहाणार्‍या व्यवस्थेला तो धाक 'दाखवण्याचं' महान कार्य तुम्ही करत आहात! तब्येतीला सांभाळा. आम्हाला तुमची गरज आहे," असं किरण मानेंनी रविवारी केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आरक्षणाचा मुद्दा आता 'करो या मरो' या स्टेजवर 

त्यापूर्वी किरण माने 27 ऑक्टोबर रोजी साताऱ्यामधील मराठा आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. यासंदर्भातील आंदोलकांबरोबरच फोटो त्यांनी फेसबुवकरुन शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. "सातार्‍यात सकल मराठा समाजाच्या वतीनं साखळी उपोषण सुरू आहे. जरांगे पाटलांना सपोर्ट म्हणून. सगळ्या पाहुणे मंडळींबरोबर थोडा वेळ बसलो. त्यात कोडोलीतले ७५ वर्षांचे तात्या सावंत 2 दिवस झाले उपोषणाला बसलेत. त्यांना 'तब्येतीची काळजी घ्या' अशी विनवणी केली पण ऐकायला तयार नाहीत. मराठा आरक्षणाचा मुद्दा आता 'करो या मरो' या स्टेजवर आलाय. लढा द्यायलाच हवा, पण असे वयोवृद्ध लोक मैदानात उतरल्यामुळं त्यांच्या प्रकृतीची लै काळजी वाटायला लागलीय. आज एका तरण्याबांड भावानं आत्महत्या केली. चार दिवसांपूर्वी एकानं स्वत:ला संपवलं होतं. एकानं गाड्या फोडल्या... इतकं इमोशनल होऊन कसं चालंल माझ्या भावांनो," अशी भावनिक साद किरण मानेंनी मराठा तरुणांना आपल्या पोस्टमधून घातली.

काही गोष्टींची काळजीही वाटते

पुढे लिहिताना किरण माने यांनी, "आपली ताकद मोठी हाय. शांततेत काम केलं तरी पुरेसं हाय. वाघाच्या अस्तित्वात आणि डरकाळीत दहशत असते. समोरचा कितीबी माजलेला असला तरी एका डरकाळीत जाग्याव थरथरला पायजे. कशाला उतावीळ होऊन टोकाचे निर्णय घ्यायचे?" असा प्रश्न मराठा समाजातील तरुणांना विचारला आहे. तसेच या पोस्टमध्ये मनोज जरांगे पाटलांचं कौतुक करताना किरण मानेंनी, "जरांगे पाटलांच्या धैर्याला आणि चिकाटीला सलाम. यश मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाय आपला मराठा गडी, असा आत्तातरी पूर्ण विश्वास वाटतोय! फक्त अशा आंदोलनांचा इतिहास लक्षात घेता काही गोष्टींची काळजीही वाटते आहे. असो. आपण सध्या तरी फक्त 'पॉझीटिव्ह' विचार करूया. जरांगे पाटलांच्या पाठीशी उभे रहाणं गरजेचं हाय," असं म्हटलं आहे.

उतावळेपणा करायच्या आधी कुटूंबाचा विचार करा

"माझ्या मराठा बांधवांनो, आपल्या रक्तात धैर्य, चिकाटी आणि हिंमत हाय! योग्य ठिकाणी, योग्य गोष्टीचा वापर करत पुढं जाऊया. उतावळेपणा करायच्या आधी कुटूंबाचा विचार करा. आपण आपल्या समाजातल्या गोरगरीबांच्या पुढच्या पिढ्यांसाठी लढतोय. आरक्षण मिळणार... आपण मिळवणारच... कुणाचा बाप ते थांबवू शकत नाय! जय जिजाऊ... जय शिवराय... जय भीम," असं पोस्टच्या शेवटी किरण मानेंनी म्हटलं आहे.