अहमदनगर : नगर जिल्ह्याच्या राजकारणातील गुन्हेगारी उफाळून आली आहे. पालिका पोटनिवडणुकीच्या वादातून काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादातून दोन जणांना जीव गमवावा लागला. शिवसेनेचे उपप्रमुख संजय कोतकर आणि शिवसेना कार्यकर्ते वसंत ठुबे अशी मृतांची नावे आहेत. अहमदनगरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. आमदार संग्राम जगताप यांना अटक करण्यात आली आहे. दुहेरी हत्या प्रकरणी संग्राम जगताप, अरुण जगताप आणि भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह सुमारे ३० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरुण जगताप आणि शिवाजी कर्डिले यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जाते आहे. नगरच्या केडगावमध्ये शिवसेना पदाधिकारी संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यात शिवसेना नेत्यांनी संग्राम आणि अरुण जगताप यांची नावे घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आणले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयांची तोडफोड करून जगताप यांना सोडवले.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात फुटलेल्या काचांचा खच पडला आहे. या घटनेने नगर जिल्ह्यातील पोलिसांची अब्रू वेशीला टांगली गेली आहे. पोलीस तपास न करता एक हल्लेखोर संदीप गुंजाळ सुपा पोलीस ठाण्यात हजर झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्याकडे एक गुप्ती गावठी पिस्तुल आणि काडतुसे सापडली आहेत. नगर-पुणे रस्ता शिवसैनिकांनी संध्याकाळ पासून मध्यरात्री उशिरापर्यंत अडवून धरला. यामुळे नगर शहरातून औरंगाबाद, सोलापुर आणि नाशिक, शिर्डीकडे जाणारी वाहतूक बाह्य वळण रस्त्याने वळविण्यात आली आहे. यात पोलिसांनी बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलीस उप-अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या गाडीवर दगफेक झाली आणि जमावाने पोलिसांना देखील मारहाण केली.
आज शिवसेनेनेनं नगर जिल्हा बंदची हाक दिली आहे. आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप तसेच खून करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत. त्या अगोदर गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.