पराग ढोबळे, झी मीडिया
Nagpur Crime News: लहान मुलांचे हट्ट पुरवले गेले नाहीत तर कधी कधी ते टोक गाठतात. असाच एक धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. बहिणीने मोबाइलचा हट्ट न पुरवल्यामुळं एका 11 वर्षांच्या मुलाने चक्क गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने कुटुंबीयांना एकच धक्का बसला आहे. तर, इतक्या क्षुल्लक कारणामुळं मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हिंगणा तालुक्यातील डिगडोह इथं 11 वर्षीय चिमुकल्याने दुप्पट्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हंसराज कृष्णकांत राय असं 11 वर्षीय चिमुकल्याचं नाव आहे. हंसराजचे वडील बाहेरील राज्यात कामाला असल्यामुळे तो त्याच्या आजोबाकडे आई आणि दोन बहिणीसोबत राहतो.
हंसराजची मोठी बहीण असून तिच्याकडे त्याने मोबाईलसाठी हट्ट धरला होता. पण तिने त्याला फोन दिला नाही. दरम्यान त्याला मोबाईल न दिल्यानं मोठ्या बहिणीचा राग आला अन् त्याच रागात तो खोलीत निघून गेला. सायंकाळी 5 वाजताच सुमारास घरात फक्त त्याची मोठी बहीण होती. बराचवेळ हंसराज खोलीबाहेर आला नाही म्हणून त्याच्या बहिणीने खोलीत जाऊन पाहिले.
खोलीत हंसराजने पंख्याला दुपट्टा बांधून गळफास घेतल्याचं दिसताच तिला एकच धक्काच बसला. कुटुंबियांनी दिलेल्या लेखी माहितीवरून घटनेची नोंद केल्याची माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी दिली आहे.
वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील दहेगाव गोसावी येथे 23 वर्षीय युवती घरी असताना तिला घराच्या बाहेर बोलावून हत्या करण्यात आली आहे. या थरारक घटनेने दहेगाव गोसावी येथे तणावाचे वातावरण असून ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे घडली याचे कारण अद्याप समोर आले नाहीये. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाली असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे. वर्ध्यातुन दोन तरुण दहेगाव गोसावी येथे सोबत पोहोचले होते. त्यांच्यासोबत दोन मुलीदेखील होत्या. तरुणांनी दोन मुलींना घराच्या गेटजवळून युवतीला हाक द्यायला लावलीय. रात्रीला युवती घराबाहेर अंगणात येताच मागून आलेल्या युवकांनी चाकूने तिच्या गळ्यावर सपास वार केले आहेत.