संतापजनक! नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डीनला टॉयलेट साफ करायला लावलं, शिंदे गटाच्या खासदाराचं कृत्य

Nanded Govt Hopital : नांदेडमध्ये मृत्यूचं थैमान सुरु असतानच आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड शासकीय रुग्णालयात भेट देऊन तिथल्या डीनला स्वच्छतागृहा साफ करायला लावलं

सतिश मोहिते | Updated: Oct 3, 2023, 02:06 PM IST
संतापजनक!  नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डीनला टॉयलेट साफ करायला लावलं, शिंदे गटाच्या खासदाराचं कृत्य title=

सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड :  नांदेडमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (Nanded Govt. Hospital) रूग्णालयात गेल्या 48 तासांत 31 रूग्णांचा मृत्यू (31 Deaths) झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी रुग्णालयाच्या डीनना स्वच्छतागृह साफ करायला लावलं. खासदार हेमंत पाटील आज सकाळी रुग्णालयात पाहाणी करण्यासाठी आले होते. पाहाणी करताना त्यांना रुग्णालयातील स्वच्छतागृहात प्रचंड अस्वच्छता दिसून आली. त्यामुळे संतापलेल्या खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचा डीन एस आर वाकोडे यांच्या हातात झाडू आणि पाणी देऊन रुग्णालयातील शौचालयं त्यांना साफ करायला लावली 

रुग्णालयात सर्वत्र अस्वच्छता आहे. सर्वच शौचालयमध्ये प्रचंड घान, दुर्गंधी होती. त्यामुळे रुग्णालयाच्या स्वच्छतेवरुन खा. हेमंत पाटील यांनी डीनना धारेवर धरलं. अधिष्ठातांना सोबत घेऊन हेमंत पाटील यांनी चक्क त्यांच्या हातात झाडू देऊन शौचालय साफ करायला लावले. शौचालयात पाणी टाकून अधिष्ठातांना साफसफाई करायला लावली. इथे घडलेल्या मृत्यूला  डॉक्टर जबाबदार असून सर्वांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे. 

नांदेड शासकीय रुग्णालयात 260 स्वच्छता कर्मचारी आहेत. पण हे कर्मचारी अधिकाऱ्यांनी स्वत:च्या घरची धुणीभांडी करण्यासाठी ठेवली असतील, तर सामान्य माणसांनी करायचं काय, असा सवाल हेमंत पाटील यांनी विचारला आहे. रुग्णालयातील नळांना तीन महिने पाणी नाही. अत्यंत घाणेरडी शौचालयं आहे. कोणी त्या शौचालयात जाऊ शकत नाही, अशी त्यांची अवस्था आहे. शासन तुम्हाला पैसे देते, यंत्रणा देतं, यानंतरही असा ढिसाळ कारभार सुरु असल्याचं खासदार हेमंत पाटील यांनी म्हटलंय.

राज ठाकरे यांची टीका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नांदेडच्या घटनेवर टीका केली आहे. नांदेडमधल्या सरकारी रुग्णलयात गेल्या 24 तासात 24 मृत्यू झाले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडली. राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधाचा तुटवडा असल्यामुळे 'औषध पुरवून वापरा' असा सल्ला दिला जातोय असं कळतंय. आणि ह्या घटना फक्त नांदेड, ठाणे आणि मुंबईपुरत्या नाहीत तर सर्वत्र आहेत. तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये पण महाराष्ट्राचं काय ? दुर्दैव असं की सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी आहे अशी परिस्थिती आहे. सरकारने स्वतःच आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचं आरोग्य कसं सुधारेल ह्याकडे अधिक लक्ष द्यावं, असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.