नवी दिल्ली : कोरोना व्हायरसबाबत अलर्ट करण्यासाठी सरकारकडून आरोग्य सेतू ऍप तयार करण्यात आलं. परंतु गेल्या महिनाभरापासून सतत याची सुरक्षा आणि खासगी माहिती चोरी होण्याची अफवा पसरत होती. मंगळवारी फ्रान्समधील एका हॅकरने आरोग्य सेतू ऍपवरुन खासगी माहिती चोरी होत असल्याचा दावा केला होता. मात्र सरकारकडून याबाबत प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
आरोग्य सेतु ऍपमध्ये कोणताही डेटा किंवा सुरक्षिततेचं उल्लंघन झाल्याची बाब आढळली नसल्याचं, बुधावारी सरकारकडून सांगण्यात आलं. फ्रेंच हॅकर आणि सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट एलोट एल्ड्रसन यांनी मंगळवारी दावा केला की, ऍपच्या सुरक्षेाबाबत प्रश्न निर्माण झाला असून नऊ कोटी भारतीयांच्या गोपनीयतेला धोका निर्माण झाल्याचं सांगण्यात आलं. मात्र हा दावा फेटाळत सरकारने, आमच्या हॅकरकडून वापरकर्त्याची कोणतीही वैयक्तिक माहिती धोक्यात असल्याचं, सिद्ध केलं नसल्याचं सांगितलं आहे.
आम्ही आमच्या सिस्टमची निरंतर तपासणी करत असतो. कोणताही डेटा किंवा सुरक्षेचं उल्लंघन झालं नसल्याचं आरोग्य सेतू टीमकडून सांगण्यात आलं आहे.
आरोग्य सेतूने दिलेल्या माहितीनुसार, वापरकर्ता ऍपमध्ये नोंदणी करताना संपर्काबाबतची माहिती जमा करतो. वापरकर्त्याच्या भागात कोरोना रुग्ण आढळल्यास, त्याच्या स्थानाबाबत माहिती मिळते आणि ही माहिती सुरक्षित सर्व्हरमध्ये सेव्ह केली जाते. परंतु ही सर्व माहिती आधीपासूनच सर्व स्थानांसाठी सार्वजनिक असून त्यामुळे यात कोणताही खासगी किंवा संवेदनशील डेटा नसल्याचं सांगण्यात आलं आहे.