मोर तडफडत होता पण त्याने कॅमेऱ्यासमोरच एक-एक करत उपटली पिसं अन् त्यानंतर....; कशासाठी तर Reel साठी

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत एक तरुण राष्ट्रीय पक्षी मोराचे (peacock) पंख निर्दयीपणे उपटत असल्याचं दिसत आहे. वन विभागाने (Forest Department) या व्हिडीओची दखल घेतली आहे. तरुणाला अटक करण्यासाठी पथक पोहोचले असता तो घरात नव्हता. यानंतर त्याचा शोध घेतला जात आहे.   

शिवराज यादव | Updated: May 22, 2023, 01:44 PM IST
मोर तडफडत होता पण त्याने कॅमेऱ्यासमोरच एक-एक करत उपटली पिसं अन् त्यानंतर....; कशासाठी तर Reel साठी  title=

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) होण्याच्या उद्धेशाने सध्याची तरुणाई अनेकदा मर्यादा ओलांडताना दिसते. रिल्सच्या या जमान्यात प्रत्येकजण लाईक्स आणि व्ह्यूजच्या मागे लागला आहे. यातूनच अनेकदा आपल्या हातून गुन्हा घडतोय याचंही भान काहींना राहत नाही. नुकतीच अशी एक घटना समोर आली आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण संताप व्यक्त करत असून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एक तरुण अत्यंत निर्दयीपणे मोराचे हाल करताना दिसत आहे. वनविभागाने (Forest Department) या घटनेची दखल घेतली असून, त्याचा शोध घेतला जात आहे. 

मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. येथे एका तरुणाने अत्यंत निर्दयीपणे मोरावर अत्याचार केले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत तरुण मोराचे पंख अत्यंत अमानुषपणे उपटताना दिसत आहे. यावेळी त्याच्यासह एक तरुणीही दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागानेही त्याची दखल घेतली आहे. वनविभगाने याप्रकरणी चौकशी सुरु केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, रिठी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही घटना घडली आहे. डीएफओ गौरव शर्मा यांनी सांगितलं आहे की, गुजरातमधील एक स्वयंसेवी संस्थेने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअऱ केला होता. हा व्हिडीओ नंतर व्हायरल झाला होता. 

व्हायरल झालेल्या या व्हिडीओची दखल घेण्यात आली असल्याचं डीएओने सांगितलं आहे. व्हिडीओमध्ये तरुणाची बाईकही दिसत आहे. बाईकवरील नंबर प्लेटच्या आधारे तरुणाची ओळख पटवण्यात आली आहे. आरोपीचं नाव अतुल असून तो कटनीमधील रिठी परिसरात राहणार आहे. 

तरुणाची माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यासाठी वनविभागाचं पथक दाखल झालं होतं. पण पथक पोहोचलं तेव्हा आरोपी तरुण घरात नव्हता. यानंतर त्याच्या अटकेसाठी पोलिसांची मदत घेतली जात आहे. याप्रकरणी तपास अद्याप सुरु आहे.

प्राण्यांवर अत्याचार होत असल्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी लोकांनी एका श्वानाला जीवे मारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केला होता. यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. 

गाजियाबाद येथील लोनीजवळ ट्रॉनिका सिटीच्या इलाइचीपूर परिसरात काही लोकांना एका कुत्र्याला निर्दयीपणे मारहाण केली होती. व्हिडीओत दोन लोक कुत्र्याला साखळीने लटकवत मारताना दिसत होते. यावेळी एक व्यक्ती बाजूला उभा राहून हे सर्व पाहत होते. पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता, कुत्रा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता, त्याला होणारा त्रास आम्हाला पाहवत नव्हता. तडपून त्याचा मृत्यू होऊ नये यासाठी आम्ही त्याला ठार केलं असा दावा त्यांनी केला.