जयपूर : राजस्थानमध्ये राजकीय घडामोडी अजूनही सुरू आहेत. मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यात आता आरपारची लढाई सुरु आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस आणि यूपीच्या प्रभारी प्रियंका गांधी वाड्रा यांनी या दोघांमध्ये सामंजस्याच्या प्रयत्नांचा वेग वाढवला आहे. प्रियंका यांनी केसी वेणुगोपाल आणि अहमद पटेल यांना सचिन पायलट यांच्यासोबत बोलण्यास सांगितले आहे.
या अगोदरही प्रियंका गांधी वाड्रा यांनी सचिन पायलट यांच्यासोबत चर्चा केली होती, परंतु सचिन पायलट सहमत नव्हते. सचिन पायलट यांची नाराजी दूर करण्याचा आता पुन्हा प्रयत्न सुरू आहे. प्रियंका यांनी गांधी घराण्यातील सर्वात जवळचे अहमद पटेल आणि संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांना याबाबतची जबाबदारी दिली आहे.
विशेष म्हणजे सचिन पायलटसंदर्भात काँग्रेस हाय कमांडकडून मवाळ भूमिका घेण्यात येत आहे. राजस्थानचे काँग्रेस प्रभारी अविनाश पांडे म्हणाले की, सचिन पायलटसाठी पक्षाचे दरवाजे बंद केलेले नाहीत. या व्यतिरिक्त अनेक पक्ष नेत्यांनी असे सांगितले की सचिन पायलटसाठी दरवाजे नेहमीच खुले असतात.
मात्र, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना आता सचिन पायलट यांना परत पक्षात घेण्याची इच्छा नाही. यामुळेच काल गेहलोत यांनी सचिन पायलटवर थेट हल्ला केला होता. ते म्हणाले होते की, स्वत: उपमुख्यमंत्रीच येथे डील करत होते. आणि ते आमच्या समोर स्पष्टीकरण देत होते. आज एजन्सीचे नाव घेऊन लोकांना त्रास दिला जात आहे. आम्हीही बर्याच काळापासून राजकारणात आहोत.
पायलट यांच्यावर सीएम अशोक गेहलोत यांनी केलेल्या वैयक्तिक हल्ल्यामुळे काँग्रेस हायकमांड नाराज आहेत. सचिन पायलट यांना नोटीस पाठवल्यानंतर ही अशोक गेहलोत यांना याबाबत जाब विचारण्यात आला. आता प्रियंका गांधी वाड्रा यांच्या एन्ट्रीनंतर सचिन पायलट परतणार की नाही. याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.