जयपूर : राजस्थानमधील सत्तासंघर्ष थांबायचे नाव घेत नाही. विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या (Congress) बंडखोर १९ आमदारांना नोटीस पाठविल्यानंतर आता काँग्रेसमधून हकालपट्टी केले नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी न्यायालयात धाव घेण्याचे ठरविले आहे. १९ आमदारांना राजस्थान विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी यांनी नोटीस पाठवली आहे. त्यामुळे पायलट अधिक आक्रमक झाले आहेत.
विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी यांनी नोटीस पाठवत १९ आमदारांना शुक्रवारपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. त्यामुळे आमदारांकडून काय उत्तर येणार याकडे लक्ष असताना बंडखोर नेते सचिन पायलट यांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या नोटीसला उत्तर न देण्याचा निर्णय घेतल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे. विधानसभा अध्यक्ष नोटीस कशी काय पाठवू शकतात, असा सचिन पायलट यांचना दावा आहे. हा मुद्दा पकडून ते न्यायालयात जाणार आहे. आता न्यायालयात ते काय मुद्दे उपस्थित करतात, यावर बरेच काही असेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
राजस्थानमधील कॉंग्रेस पक्षाचे सचिन पायलट यांनी पक्षा विरोधात बंड पुकारल्याने त्यांच्यावर कारवाई करताना त्यांची उपमुख्यमंत्री पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. तसेच त्यांचे प्रदेश अध्यक्षपदही काढून घेण्यात आले. तसेच त्यांच्या दोन समर्थक मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. त्यानंतर बुधवार काँग्रेसच्या ५९ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. हे सगळे सचिन पायलट समर्थक आहेत. काँग्रेसने सचिन पायलट यांच्यावर कारवाई केल्याने हे पदाधिकारी नाराज आहेत.
बुधवारच्या टोंकमध्ये कॉंग्रेसचे ५९ पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे देत सचिन पायलट यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईला विरोध दर्शवला आहे. याआधी पालीचे जिल्हाध्यक्ष चुन्नीलाल चाडवास यांनीही राजीनामा दिला होता. ही कारवाई अयोग्य असल्याचे म्हटले आहे.
कॉंग्रेसच्या पक्षाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सचिन पायलट आणि १८ आमदारांनी गैरहजेरी लावली. १९ आमदारांना बैठकीला बोलावण्यात आले होते. मात्र, त्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे काँग्रेसने त्यांना नोटीस पाठवली आहे. त्याचवेळी आमदारांच्या बैठकीत सचिन पायलट यांना पदावरुन हटविण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली. त्यानंतर काहीवेळात सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्रीपदावर हकालपट्टी करण्यात आली.