लेक म्हणावी की...; शेतजमीन विकून वडिलांनी जमवलेले 5 लाख घेऊन प्रियकरासोबत मुलगी पसार

UP Crime : लग्नाची तारीख जवळ येत असल्याने मुलीचे कुटुंबिय सध्या तणावाखाली आहे. सगळी तयारी झालेली असताना मुलीने उचलेल्या पावलामुळे सगळेच हैराण आहेत. पोलीस अद्याप शोध घेत असले तरी मुलीचा कोणताही थांगपत्ता लागलेला नाही.

आकाश नेटके | Updated: Jun 8, 2023, 10:16 AM IST
लेक म्हणावी की...; शेतजमीन विकून वडिलांनी जमवलेले 5 लाख घेऊन प्रियकरासोबत मुलगी पसार title=
(प्रातिनिधीक छायाचित्र)

Crime News : उत्तर प्रदेशातून (UP Crime) एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या महाराजगंजमध्ये लग्नाच्या काही दिवसांआधीच तरुणीने प्रियकरासोबत पळ काढला आहे. या सर्व प्रकारानंतर हतबल पित्याने मुलीच्या अपहरणाची तक्रार पोलीस ठाण्यात (UP Police) दिली आहे. मात्र अद्यापही मुलीचा शोध लागलेला नाही. धक्कादायक बाब म्हणजे मुलीने घरातून पाच लाख रुपये घेऊन प्रियकरासोबत पळ काढला होता. या घटनेनंतर कुटुंबिय मुलीच्या परतण्याची आस लावून बसले आहेत.

लग्नाची तारीख जवळ येत असल्याने कुटुंबियांचे वाढलं टेंन्शन

उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यातील पारसमलिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात लग्नाच्या आधीच एक मुलगी तिच्या प्रियकरासह पळून गेल्याचे समोर आले आहे. मुलीच्या लग्नासाठी वडिलांनी शेती विकून पाच लाख रुपये घरात ठेवले होते. वडिलांनी मुलीसाठी दागिनेही बनवले होते. मात्र प्रियकरासोबत पळून जाण्यापूर्वी तरुणीने घरात ठेवलेले पैसे आणि दागिने घेऊन घरातून पळ काढला आहे. या प्रकरणी संतापलेल्या वडिलांच्या तक्रारीवरून पारसमलिक पोलिसांनी गावातीलच तरुणाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्यापही मुलगी सापडलेली नाही. लग्नाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसा घरातील सदस्यांवरचा तणाव वाढत आहे. मुलीला घरी आणण्यासाठी नातेवाईक दररोज सकाळपासून सायंकाळपर्यंत पोलीस ठाण्यात चकरा मारत आहेत. मात्र, त्यांच्या पदरी निराशाच येत आहे.

11 जून रोजी होणार होते लग्न

मुलीच्या वडिलांनी सांगितले की, "आपल्या मुलीचे लग्न ठरले आहे. 11 जून रोजी वरात निघणार आहे. सर्व तयारी पूर्ण झाली आहे. नातेवाइकांमध्ये निमंत्रण पत्रिकांचे वाटपही करण्यात आले आहे. मुलीच्या लग्नासाठी आपली शेती विकली होती. यातून मिळालेल्या पैशातून त्यांनी मुलीसाठी दागिने बनवले. घरात पाच लाख रुपये रोख ठेवले होते. गावातील एका तरुणाने मुलीला आमिष दाखवून 31 मे रोजी पळवून नेले. पैसे आणि दागिने जप्त करून आरोपींवर कठोर कारवाई करावी. परसमलिक पोलिसांनी मुलीचाही शोध घ्यावा. त्यामुळे भविष्यात अशी घटना घडविण्याचे धाडस कोणीही तरुण करू शकणार नाही."

या प्रकरणी पारसमलिक पोलीस ठाण्याचे प्रभारी देवेंद्र लाल यांनी सांगितले की, "मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून गावातील आरोपी तरुणाविरुद्ध कलम 366 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीला परत आणण्यासाठी पोलीस सातत्याने प्रयत्न करत आहेत. लवकरच मुलीचा शोध घेतला जाईल तसेच आरोपींवर कायदेशीर कारवाई केली जाईल."