Uddhav Thackeray Shivsena On Modi Adanai Relationship: "नरेंद्र मोदी हे गौतम अदानींचे एजंट आहेत व अदानी मिळवत असलेल्या संपत्तीत मोदी हे मोठे वाटेकरी आहेत याबाबत लोकांच्या मनात कोणतीच शंका उरलेली नाही," असा घणाघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे. "नायजेरियाचे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अदानी यांनी चालवायला घेतले व त्यासाठी तेथील राजकारण्यांना मोठ्या रकमांची लाच दिल्याचे काही दिवसांपूर्वी उघड झाले. नायजेरियाची जनता तेथे अदानींविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे व ‘अदानी गो बॅक’चे नारे देत आहे. या आंदोलकांच्या नेत्यावर भारतीय ईडी आणि सीबीआय कारवाई करू शकत असते तर ती केलीच असती. पण सगळ्यात मोठा स्फोट केला आहे तो केनियाचे माजी पंतप्रधान रैला ओडिंगा यांनी. केनियातील प्रकल्पांची कामे अदानी यांना द्यावीत यासाठी मोदी यांनी खास प्रयत्न केले व त्यामुळेच केनिया अदानी यांचा शिरकाव झाला. मोदी तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते व एका भेटीत त्यांनी अदानी यांची आपल्याशी खास ओळख करून दिली. इतकेच नव्हे तर, अदानी हे किती महान आहेत हे पाहण्यासाठी केनियाच्या प्रतिनिधी मंडळास मोदी यांनी गुजरातला बोलावून त्यांचा भलताच पाहुणचार केल्याची माहिती केनियाच्या माजी पंतप्रधानांनी दिली," असं ठाकरेंच्या पक्षाचं मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये म्हटलं आहे.
"मोदी व गौतम अदानीच्या विशेष व नाजूक संबंधावर प्रकाश टाकणारा हा विषय आहे. श्रीलंकेतील ऊर्जा प्रकल्प अदानींना मिळावेत यासाठी मोदींचा श्रीलंका सरकारवर दबाव होता, असे तेथील आजी-माजी मंत्र्यांनी जाहीर केले. मोदी हे त्यांची सत्ता जनतेसाठी राबवत नसून त्यांचा लाडका मित्र अदानीशेठ यांच्यासाठी राबवत आहेत. भारतातील सर्वच सरकारी संपत्ती मोदी यांनी अदानीशेठना कवडीमोल भावात दिली. विमानतळ, बंदरे, जमिनी, सार्वजनिक उपक्रम असे सर्वकाही आज अदानी यांच्या मालकीचे झाले व सातबाऱ्यातील हे फेरफार मोदी यांनी करून घेतले. धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली मुंबईतील दुग्धशाळांच्या जमिनी, वांद्रे रेक्लमेशन, मिठागरांच्या जमिनी मोदी यांनी अदानीशेठला दिल्या. विदर्भातील शाळाही दिल्या. त्यामुळे मुंबईची मालकी महाराष्ट्राकडे असली तरी मालकाच्या हाती भिकेचा कटोरा देऊन अदानी यांना मोदींनी मुंबईचे सावकार किंवा पठाण केले आहे. अदानीशेठना श्रीमंत करणारे मोदी हे स्वतःला फकीर मानतात. आपण गरिबीत जन्मलो, गरिबीत वाढलो, असे ते सांगतात. मग हा फकीर फक्त अदानी यांनाच श्रीमंतीच्या शिखरावर चढवीत आहे त्यामागचे कारण काय?" असा सवाल ठाकरेंच्या पक्षाने विचारला आहे.
"मोदी हे उपभोगशून्य आहेत, असे त्यांचे अंधभक्त मानतात. तरीही अलीकडचे त्यांचे श्रीमंती थाट पाहण्यासारखे आहेत. अदानी यांना भारतात नव्हे, तर जगात संपत्ती वाढवता यावी यासाठी मोदींचे अथक प्रयत्न आहेत. त्या श्रीमंतीचा व संपत्तीचा खरा मालक दुसराच कोणी आहे काय? अदानीची संपत्ती ही कुणाची बेनामी संपत्ती आहे काय? तसे नसते तर भारत तर भारत, पण परदेशात जाऊन पंतप्रधानांनी अदानीसाठी इतकी खटपट, लटपट केली नसती. अदानीच्या दौलतीचे खरे मालक आपण आहोत असेच मोदी कृतीतून दाखवत आहेत. मोदींना बायको ना मुले. संसार व कुटुंबाचे सर्व पाश त्यांनी तोडले; पण अदानीच्या पाशात ते अडकले. मोहमायेच्या वेगळ्याच गुंत्यात ते अडकले. मोदी जेथे जातील तेथे अदानी त्यांच्यासोबत असतात. व्यापार उद्योगांचे करार दोन देशांत होत असतात. पण आता मोदींच्या मर्जीने ते इतर देश व अदानी यांच्यात होतात. याचे गौडबंगाल काय?" असा प्रश्न ठाकरेंच्या पक्षाने विचारला आहे.
"केनिया, नायजेरिया, बांगलादेश, सिंगापूर, इस्त्राएल, नेपाळ, टांझानिया, व्हिएतनाम, श्रीलंकेसह इतर अनेक देशांत मोदीकृपेने अदानी यांचा उद्योग फळफळला आहे. पण त्या प्रत्येक देशात नफेखोर अदानीच्या विरोधात तेथील जनता रस्त्यावर उतरली व अदानी यांच्याबरोबर मोदी यांनाही दूषणे देत आहे. हा आमच्या देशाचा अपमान ठरत नाही काय?" असा प्रश्न ठाकरेंच्या पक्षाने विचारला आहे. "पाकिस्तान, बांगलादेशातही अदानीची मोठी गुंतवणूक असावी. मोदी यांच्या अदानीप्रेमामुळे ईडी व सीबीआयने अनेक उद्योगपतींना त्रास दिला. तुरुंगात टाकले, संपत्ती जप्त केली. या जाचाला कंटाळून दहा हजारांवर लहानमोठ्या उद्योजकांनी देशातून गाशा गुंडाळला व ते परदेशात जाऊन गुंतवणूक करत आहेत. यातील अनेक उद्योगपतींनी चीनचा मार्ग निवडला. यात नुकसान झाले ते भारताचे. आपल्या गुंतवणूकदारांना भारतापेक्षा चीन जवळचा वाटत असेल तर तो मोदींचा पराभव आहे," अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे.
"निर्मला सीतारामन यांनी घेतलेल्या चेन्नईतील बैठकीत एका उद्योजकाने जी.एस.टी.वर प्रश्न उपस्थित केले म्हणून त्या उद्योगपतीस अपमानित करून निर्मलाबाईंची कान धरून माफी मागायला लावली गेली. प्रामाणिकपणे व्यापार करणाऱ्यांना भारतात चांगले दिवस राहिलेले नाहीत, पण अदानीसारख्यांना देश-विदेशात लूटमार करण्याचा मुक्त परवाना मोदी यांनी दिला. देशातील जनता थंड बर्फाचा गोळा होऊन पडल्यामुळे हे घडत आहे. केनिया, नायजेरिया या लहान देशांतील जनता रस्त्यावर उतरून रामायणातील ‘जटायू’प्रमाणे लढा देत आहे. मोदी हेच अदानी साम्राज्याचे खरे सूत्रधार आहेत हे केनियाच्या माजी पंतप्रधानांनी स्पष्ट केले. एका फकिराची ही रंजक कहाणी आहे. मोदींचा झोला देशाला महाग पडला आहे. भारतीय लोकहो, केनियाकडून काही शिका," असा सल्ला लेखाच्या शेवटी ठाकरेंच्या पक्षाने दिला आहे.