नवी दिल्ली : हैदराबाद एन्काऊंटरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. एन्काऊंटरच्या संपूर्ण चौकशीची तसेच हैदराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार आणि एन्काऊंटरमध्ये समाविष्ट असलेल्या पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. एन्काऊंटरसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले नसल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. सोमवारी याप्रकरणी सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांनी खासदार जया बच्चन आणि दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांना प्रतिवादी बनवण्यात आले आहे. याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.
दिशाच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींच्या एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तेलंगणा पोलिसांविरोधात या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. अॅड. सीएस मणी आणि प्रदीप कुमार यादव यांनी हैद्राबाद एन्काऊंटरविरोधात याचिका दाखल केली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी न्यायालयाने सन २०१४ ला दिलेल्या निर्देशांचे पालन केलेले नाही, असे या याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिले आहे.
तसेच एन्काऊंटरमध्ये सहभागी असलेल्या पोलिसांविरोधात एफआयआर दाखल करुन त्यांच्यावर कारवाई करावी, असे याचिकेत म्हटले आहे. हैद्राबादेतील दिशा या तरुणीवर सामुहिक बलात्कार करुन हत्या केल्याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले होते. या घटनेनंतर हैद्राबादेत संतापाची लाट होती.
जनतेचा आक्रोश पाहता पोलिसांनी तपासासाठी मध्यरात्रीच या चार आरोपींना घटनास्थळी नेले. दरम्यानच्या काळात हे चारही आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नांत होते. आरोपींनी पोलिसांच्या हातातील शस्त्रे ओढत पळून जाण्याचा प्रयत्न केला, असा दावा पोलिसांनी केला आहे. यावेळी पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना ते दाद देत नसल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यामध्ये हे चारही आरोपी मारले गेले.