देवदूत होऊन आले लष्कराचे जवान, पुरातील सुटकेचा थरार

एक जबरदस्त थरार जम्मूमध्ये पाहायला मिळाला.

Updated: Aug 19, 2019, 06:50 PM IST
देवदूत होऊन आले लष्कराचे जवान, पुरातील सुटकेचा थरार title=

नवी दिल्ली : एक जबरदस्त थरार जम्मूमध्ये पाहायला मिळाला. तवी नदीमध्ये दोघे अडकले होते. वायुदलाचं हेलिकॉप्टर येथे पोहोचलं आणि दोघांची सुटका केली. हा थरार काळजाचा ठेका चुकवणारा होता. उत्तरेत पावसानं प्रचंड कहर केला आहे. जम्मूमधली तवी नदीचं खवळलेलं पाणी आणि पाहता पाहता पाण्याचा जोर प्रचंड वाढला. नदीत गेलेले चौघे अडकून पडले. सुटकेचा कुठलाच मार्ग दिसत नव्हता. दोघांनी धरणाच्या एका भिंतीवर कसाबसा आसरा घेतला. तर दोघे पोहोत पोहोत किनाऱ्यावर पोहोचले. खाली पाहिलं तरी धस्स होईल. 

जिवंत राहण्याची खरं तर कुठलीही आशा नव्हती. कारण कुठल्या क्षणी तवीचं पाणी वाढेल आणि कवेत घेईल, हे सांगता येत नव्हतं. सगळ्या आशा एकवटून हे दोघे बांधावर बसून होते. तवी नदीत दोघे अडकल्याची माहिती लष्कराला मिळाली आणि सुरू झाला दोघांच्या सुटकेचा जबरदस्त थरार.

भारतीय वायूदलाचं हेलिकॉप्टर आलं. देवदूताच्या रुपानं लष्कराचे जवान आले. अडकलेल्या दोघांच्या सुटकेसाठी एक जवान खाली उतरला. पण नेमकी हेलिकॉप्टरच्या शिडीची दोरी तुटली आणि जवान नदीत पडला. मग हेलिकॉप्टरमधून दुसरा जवान शिडीच्या मदतीनं बांधावर उतरला.  अडकलेल्या दोघांनाही हेलिकॉप्टरच्या मदतीनं वर उचलण्यात आलं. 

दोघांची सुटका झाल्यावर शेवटी जवानालाही हेलिकॉप्टरनं उचलून घेतलं. दोघांच्या नशिबाची, जगण्याची दोरी मजबूत होती. पण त्याहीपेक्षा सलाम वायुदलाच्या जवानांना...