नवी दिल्ली : मार्चचे 18 दिवस गेले, परंतु पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलच्या किंमती (Diesel Price) वाढल्या नाहीत. फेब्रुवारीमध्ये पेट्रोल आणि डिझेल 16 वेळा महागले. मागच्यावेळी 27 फेब्रुवारीला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) वाढ करण्यात आली होती. यातून सर्वसामान्यांना नक्कीच थोडासा दिलासा मिळाला आहे, पण त्याचबरोबर वाईट बातमी म्हणजे जीएसटीच्या कक्षेत पेट्रोकेमिकल उत्पादन आणण्याच्या आशा धुसर होत आहेत. पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची कोणतीही योजना नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
मार्चमध्ये आतापर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर अद्याप वाढलेले नाहीत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतील शेवटचा बदल 27 फेब्रुवारी 2021 ला झाला होता. तेव्हा दिल्लीत पेट्रोलच्या किंमती 24 पैशांनी वाढल्या आणि डिझेल 15 पैशांनी महागले. पेट्रोलच्या किंमती विक्रमी स्तरावर असूनही, पेट्रोल-डिझेलचे दर सलग 19 दिवस स्थिर आहेत.
दिल्लीत पेट्रोल 91 रुपयांच्या पुढे गेले आहे. जर किंमत अशाच प्रकारे वाढत राहिली तर काही दिवसांतच मुंबईत पेट्रोलचा दर 100 रुपयांवर जाईल, आता इथले पेट्रोल 97.57 रुपये प्रतिलिटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 97.57 रुपयांवर स्थिर आहे. तर डिझेलचा दर 88.60 रुपये प्रति लीटर आहे.
गेल्यावर्षी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दिल्लीतील सर्वात महाग डिझेलची विक्री झाली होती. तेव्हा डिझेलचा दर 81.94 रुपये आणि पेट्रोलचा दर 80.43 रुपये प्रतिलिटर होता. म्हणजे त्यावेळी पेट्रोलपेक्षा डिझेल महाग विकले गेले.