"पत्नीशिवाय पंतप्रधानांनी राहू नये"; लालू प्रसाद यादव यांचा खोचक टोला; पण रोख कुणाकडे?

Lalu Prasad Yadav : पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत विचारलेल्या प्रश्नावर लालू प्रसाद यादव यांनी भाष्य केले आहे. लालू प्रसाद यांनी राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एकाच वेळी टोमणा मारला आहे.

आकाश नेटके | Updated: Jul 7, 2023, 08:18 AM IST
"पत्नीशिवाय पंतप्रधानांनी राहू नये"; लालू प्रसाद यादव यांचा खोचक टोला; पण रोख कुणाकडे? title=
(फोटो सौजन्य - PTI)

Lalu Prasad Yadav : 23 जून रोजी विरोधी पक्षांच्या (Opposition Meeting) सर्वसाधारण बैठकीनंतर राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) फुल फॉर्ममध्ये आहेत. 23 जूनच्या सर्वसाधारण बैठकीनंतर लालूप्रसाद यादव यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यानंतर लालूप्रसाद यादव यांनी राजदच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर (PM Modi) निशाणा साधला आहे. आता मी फिट आहे आणि नरेंद्र मोदींनाही फिट करेन, असा इशारा देत लालू प्रसाद यांनी टीका केली आहे. तसेच जो कोणी पंतप्रधान होईल तो पत्नी नसलेला असू नये असे विधान लालू प्रसाद यांनी केले आहे.

आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव हे त्यांच्या खास शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. गुरुवारी देखील त्यांच्या या शैलीचा प्रत्य आला. विरोधी पक्षांची एकजूट आणि पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी टोला लगावला आहे. लालू प्रसाद यादव यांनी राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवर एकाच वेळी टोमणा मारला आहे. जो कोणी देशाचा पंतप्रधान बनेल तो विनापत्नी असू नये, असे लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधानपदाचा चेहरा आणि राहुल गांधींना लग्न करण्याच्या सल्ल्याबाबत लालू प्रसाद यादव यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले होते. यावर लालू प्रसाद यांनी भाष्य केले. जो कोणी पंतप्रधान होईल, त्याने पत्नीशिवाय राहू नये. पंतप्रधानांच्या निवासस्थानी पत्नीशिवाय राहणे चुकीचे आहे. हे संपले पाहिजे. पंतप्रधान कोणीही असो, त्याने पत्नीसोबत राहावे, असे लालू प्रसाद यादव म्हणाले.

लालू प्रसाद यादव यांच्या या वक्तव्याकडे राहुल गांधींच्या उमेदवारीसोबत संबंध जोडला जात आहे. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही निशाणा साधल्याचे म्हटलं जात आहे. 2024 च्या निवडणुकीत विरोधकांना किती जागा मिळतील, असे विचारले असता ते म्हणाले, किमान 300 जागा मिळतील असे लालू प्रसाद यांनी सांगितले.

 
लालूंचा राहुल गांधींना लग्न करण्याचा सल्ला

23 जून रोजी पाटणा येथे विरोधी पक्षांची सर्वसाधारण सभा झाली होती. बैठकीनंतर सर्व पक्षांचे प्रमुख नेते संयुक्त पत्रकार परिषद घेत असताना वातावरण खुलवण्यासाठी लालू प्रसाद यादव यांनी काँग्रेस नेते आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना लग्न करण्याचा सल्ला दिला होते. 'राहुल जी, तुम्ही लग्न करा, आम्हाला वरातीत जायचे आहे, तुमच्या आईलाही तेच हवे आहे,' असे लालू यादव म्हणाले होते लालू प्रसाद यादव यांच्या या बोलण्यावर राहुल गांधींसह सर्व नेते हसले होते.