मुख्यमंत्री असावा तर असा! शपथविधी पूर्ण होण्याआधीच पूर्ण केलं जनतेला दिलेलं आश्वासन

रेवंथ रेड्डी यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान शपथविधी पूर्ण होण्याआधीच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हालचाली सुरु झाल्या होत्या.   

शिवराज यादव | Updated: Dec 7, 2023, 08:19 PM IST
मुख्यमंत्री असावा तर असा! शपथविधी पूर्ण होण्याआधीच पूर्ण केलं जनतेला दिलेलं आश्वासन title=

रेवंथ रेड्डी यांनी आज तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान शपथ घेताच त्यांनी प्रचारादरम्यान जनतेला दिलेलं आश्वासन पूर्ण करत मुख्यमंत्री निवासस्थानी लावण्यात आलेले लोखंडाचे बॅरिकेड्स काढून टाकले. विशेष म्हणजे, शपथविधी पूर्ण होण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान असणाऱ्या प्रगती मैदान येथे हालचाली सुरु झाल्या होत्या. 

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अनेक बुलडोझर्स, ट्रॅक्टर आणि बांधकाम कर्मचारी लोखंडी रॉड काढून टाकण्यासाठी हजर होते. रेवंथ रेड्डी यांनी निवडणुकीत प्रचारादरम्यान जर काँग्रेस सत्तेत आली तर हे बॅरिकेड काढून टाकणार असं आश्वासनच दिलं होतं. 

दरम्यान भारतातील सर्वात तरुण राज्य असणाऱ्या तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदी रेवंथ रेड्डी विराजमान झाले होते. रेवंथ रेड्डी यांनी के चंद्रशेखर राव यांची जागा घेतली आहे. 54 वर्षीय रेवंथ रेड्डी हे 2014 मध्ये निर्मिती झालेल्या तेलंगणा राज्याचे दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. रेवंथ रेड्डी आपले सहकारी आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये कठोर स्वभावासाठी ओळखले जातात. 

गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने अत्यंत सहजपणे विजय मिळवल्यानंतर आज हैदराबादच्या एलबी स्टेडियममध्ये शपथविधी सोहळा पार पडला. रेवंथ रेड्डी यांच्या 11 सहकार्‍यांनी त्यांच्यासोबत शपथ घेतली, यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक राहिलेले मल्लू भाटी विक्रमार्का यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

रेवंथ रेड्डी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला आता राज्याचा आर्थिक डोलारा पुन्हा सुस्थितीत आणण्याची तसंच निवडणुकीच्या वेळी दिलेली 6 आश्वासनं पूर्ण करण्याचं कठीण आव्हान आहे. काँग्रेसने जोरदार प्रचार करताना दिलेल्या 6 हमी पक्षाच्या विजयाचं एक कारण असल्याचं बोललं जात आहे. पण त्यांची पूर्तता करण्यासाठी निधी गोळा करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे. या सहा हमींपैकी एक महिलांना राज्य परिवहनच्या बसमधून मोफत प्रवास देण्याचं होतं.