डोकेदुखी, तापावर 'हे' पेनकिलर घेत असाल तर सावधान! सरकारने जारी केला अलर्ट; होऊ शकतो ड्रेस सिंड्रोम

इओसिनोफिलिया आणि सिस्टिमिक सिम्प्टम्स (ड्रेस) सिंड्रोम हा जास्त औषधं घेतल्याने होणाऱ्या एलर्जीचा प्रकार आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 7, 2023, 06:33 PM IST
डोकेदुखी, तापावर 'हे' पेनकिलर घेत असाल तर सावधान! सरकारने जारी केला अलर्ट; होऊ शकतो ड्रेस सिंड्रोम title=

इंडियन फार्माकोपिया कमिशनने (IPC) डॉक्टर आणि रूग्णांसाठी सामान्यतः वापरल्या जाणार्‍या पेनकिलर मेफेनामिक ऍसिडच्या वापराबद्दल अलर्ट जारी केली आहे. हे पेनकिलर मेफ्टल या ब्रँड नावाने लोकप्रिय आहे. प्राथमिक चाचणीत PvPI डेटाबेसमधून मेफ्टलमुळे इओसिनोफिलिया आणि सिस्टेमिक लक्षण (ड्रेस) सिंड्रोमसह होऊ शकतो असं समोर आलं आहे. हे औषध संधिवात, ऑस्टियोआर्थरायटिस, डिसमेनोरिया, सौम्य ते मध्यम वेदना, जळजळ, ताप, दातांच्या वेदना यांच्या उपचारांसाठी सुचवलं जातं.

“आरोद्य कर्मचारी, रुग्ण तसंच ग्राहकांना या औषधाच्या वापर करताना त्याचे परिणाम होण्याची शक्यता असल्याने बारकाईने निरीक्षण करण्याचा सल्ला दिला जातो. तर तुम्हाला असा काही संशय आला तर NCC-PvPI, IPC कडे संशयित प्रतिकूल औषधामुळे झालेली प्रतिक्रिया अहवाल फॉर्म/औषधांचे दुष्परिणाम संबंधी फॉर्म भरून तक्रार करा,” असं निवेदनात सांगण्यात आलं आहे.

मासिक पाळीच्या वेदना, डोकेदुखी तसंच स्नायू आणि सांधेदुखीासून मुक्तता मिळवण्यासाठी या औषधाचा ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. शिवाय, जास्त ताप आल्यास लहान मुलंदेखील हे औषध घेतात.

ब्लू क्रॉस लॅबोरेटरीजचे मेफ्टल, मॅनकाइंड फार्माचे मेफकाइंड पी, फायझरचे पॉन्स्टन, सीरम इन्स्टिट्यूटचे मेफॅनॉर्म आणि डॉ रेड्डीज इबुक्लिन पी ही या श्रेणीतील काही प्रमुख उत्पादनं आहेत.

ड्रेस सिंड्रोम म्हणजे काय?

इओसिनोफिलिया आणि सिस्टिमिक सिम्प्टम्स (ड्रेस) सिंड्रोम हा ड्रग रिअॅक्शन्स ऍलर्जीचा एक प्रकार आहे जो मोठ्या प्रमाणात औषधांच्या प्रतिक्रिया म्हणून उद्भवू शकतो. वर्ल्ड ऍलर्जी ऑर्गनायझेशन जर्नल (डब्ल्यूएओजे) नुसार, हा सिंड्रोम ताप, चेहऱ्यावरील सूज, लिम्फॅडेनोपॅथी, पुरळ आणि अवयवांच्या सहभागासह निर्माण होऊ शकतो.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जरी काही औषधे इतरांच्या तुलनेत सामान्यपणे ड्रेस सिंड्रोमशी संबंधित असली तरी जवळजवळ कोणत्याही औषधामुळे ड्रेस होऊ शकतो. अँटिबायोटिक्स, अॅलोप्युरिनॉल आणि सीझरवर उपचार करण्यासाठी वापरली जाणारी औषधे ही ड्रेसमध्ये सामील असलेली सामान्य औषधे आहेत.

अमेरिकन अकॅडमी ऑफ ऍलर्जी, दमा आणि इम्युनोलॉजीच्या मते, रुग्णाने औषधोपचार सुरू केल्यानंतर सुमारे दोन ते सहा आठवड्यांनंतर ड्रेसची लक्षणे दिसू लागतात, त्यामुळे ड्रेसमध्ये लगेच लक्षणे दिसत नाहीत. तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ घेतलेली औषधे ड्रेस सिंड्रोम उद्भवण्याची कारणं असण्याची शक्यता कमी आहे.

लक्षणं काय आहेत?

ड्रेस सिंड्रोमचं निदान झालेल्या रुग्णांमध्ये सामान्यपणे पुरळ, ताप ही लक्षणं जाणवतात. पण यकृत, फुफ्फुस किंवा मूत्रपिंडाच्या सहभागासह विविध लक्षणंही जाणवू शकतात. त्यामुळे जर लक्षणं दिसली तर यासाठी कारणीभूत असणाऱ्या औषधांचं सेवन तात्काळ थांबवणं हे शहाणपणाचं आहे.