Cyber Crime : भारतात Online Scam च्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. वर्क फ्रॉम होमपासून लॉटरी लागल्याच्या मेसेजपर्यंत दररोज फसवणूकीचे नवनवे प्रकार समोर येत आहेत. ऑनलाईन व्यवहार करताना किंवा अज्ञात व्यक्तीने दिलेली ऑनलाईन लिंक उघडताना खबरदारी बाळगा असं आवाहन वारंवार केलं जातं. पण यानंतरही लोकं त्याकडे दुर्लक्ष करतायत. परिणामी सायबर गुन्हेगारांचं (Cyber Crime) फावतं आणि सामान्य नागरिक अलगद त्यांच्या जाळ्यात अडकतात. जास्त पैसे कमवण्याच्या नादात आपल्याच खात्यातून पैसे गेल्याच्या घटना सर्वात जास्त आहेत.
WhatsApp वर नवा स्कॅम
आता व्हॉट्सअॅपवर असाच नवा स्कॅम (WhatsApp Scam) आला आहे. एका 32 वर्षांच्या व्यक्तीची तब्बल 37 लाख रुपयांची फसवणूक झाली. यानंतर हा स्कॅम उघडकीस आला आहे. बॉलिवूड कलाकारांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर (Instagram Post) लाईक करण्याचा पार्ट टाइम जॉब करण्याची ऑफर त्याला देण्यात आली होती. पण प्रश्न असा आहे की स्कॅमर्स लोकांपर्यंत पोहोचतात कसे. यावर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्कॅमर रिक्रुरटमेंट साईटवरुन लोकांचे बायोडाटा शोधून काढतात त्यानंतर त्या व्यक्तीचा फोन नंबर आणि त्याची अधिक माहिती मिळवतात आणि त्यांना पार्ट जॉबचा मेसेज पाठवतात.
असाच एक मेसेज 32 वर्षांच्या व्यक्तीला त्याच्या व्हॉट्सअॅप नंबरवर आला. मेसेजमध्ये पार्ट टाइम जॉबची ऑफर देण्यात आली होती, शिवाय पैसेही चांगले मिळणार होते. मेसेज प्रचंड प्रोफेशनल पद्धतीने तयार करण्यात आला होता. मेसेजमध्ये मोठ्या कंपनीचं नाव देण्यात आलं होतं, जेणेकरुन समोरच्या व्यक्तीला तो मेसेज खरा वाटेल.
इन्स्टावर लाईक करण्याचे पैसे
या पार्ट टाइम जॉबमध्ये सेलिब्रेटिंचे फोटो लाइक करण्यासाठी 70 रुपये मिळतील असं आमिष दाखवण्यात आलं होतं. इतकंच नाही तर दिवसाला 2 ते 3 हजार रुपये हमखास कमवण्याची संधी असल्याचं भासवण्यात आलं होतं. फोटोला लाईक केल्याचा पुरावा म्हणून त्याचे स्क्रिनशॉट कंपनीला पाठवायचे असा नियमही त्यात देण्यात आला होता. त्यामुळे फसवणूक झालेल्या व्यक्तीला हे काम विश्वसनीय असल्याची हमी मिळाली. त्यानंतर स्कॅमरने पीडित व्यक्तीला टेलीग्रामवर येण्यास सांगितलं. क्रिप्टो करन्सीच्या रुपात जास्त पैसे कमवण्यासाठी त्याला एक टास्क दिला. पैसे दुप्पट करण्याचं दावा करण्यात आला.
असं ओढलं जातं जाळ्यात
पण सुरुवातीला क्रिप्टो करन्सी विकत घेण्यासाठी काही पैसे टाकावे लागतात. एक फर्जी वेबसाईटवर त्या व्यक्तीचं लॉगिंग करण्यात आलं. पीडित व्यक्तीने सुरुवातीला स्वत:कडचे 9 हजार रुपये यात गुंतवले. त्यानतंर त्याच्या अकाऊंटला 9980 रुपये दाखवण्यात आले. म्हणजे 980 रुपयांचा त्याला फायदा झाला. त्यामुळे पीडित व्यक्तीच विश्वास आणखी वाढला. त्याला आणखी 30 हजार गुंतवण्यास सांगण्यात आलं. यावेळी त्याला तब्बल 8208 रुपयांचा फायदा झाला. आतापर्यंत पीडित व्यक्तीचा वेबसाईटवर पूर्ण विश्वास बसला होता.
जास्त पैशाच्या आमिषाने पीडित व्यक्तीने तब्बल 37 लाख रुपये गुंतवले, पण यानंतर कोणताही मेसेज आला नाही. त्याने अनेकवेळा प्रयत्न केला. पण समोरुन कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी आपली फसवणूक झाल्याच त्याला कळलं आणि त्याने याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून अशा कोणत्याही प्रलोभनांना भुलू नका असा आवाहन पोलिसांनी केलं आहे.