नवी दिल्ली : वादग्रस्त लेखिका तसलिमा नसरीन सध्या त्यांच्या एका ट्विटमुळे चर्चेत आल्यात.
दिल्ली युनिव्हर्सिटीच्या एका विद्यार्थीनीनं सार्वजनिक बसमधून प्रवास करताना एका व्यक्तीविरुद्ध छेडछाड आणि हस्तमैथुन करण्याबद्दल तक्रार दाखल केलीय. मुलीनं न घाबरता या घटनेचा व्हिडिओदेखील बनवला आणि पोलीस स्टेशनही गाठलं.
'या घटनेनं मी खूप हादरलेय... तो व्यक्ती वारंवार मला स्पर्श करत होता. मी जेव्हा ही गोष्ट जोरात ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा आजुबाजुच्या लोकांनीही त्याकडे लक्ष दिलं नाही, ना कोणी मदतीला आलं... मी त्या व्यक्तीवर ओरडलेही परंतु, त्याच्यावर काहीही फरक पडला नाही' असं या मुलीनं म्हटलंय.
ही घटना सोशल मीडियातून समोर आल्यानंतर अनेकांनी त्यावर टीका केली. परंतु, तसलिमा यांनी मात्र 'आजकालच्या रेप कल्चरमध्ये हा काही मोठा अपराध नाही कारण यात कुणीही 'पीडित' नाही, असं म्हटलंय.
'दिल्लीमध्ये एका भरलेल्या बसमध्ये एका व्यक्तीनं हस्तमैथुन केला. रेप कल्चरच्या जमान्यात हा मोठा अपराध समजला जाऊ नये. पुरुषांनी बलात्कार आणि हत्या करण्यापेक्षा त्यांनी हस्तमैथुन करावा... सार्वजनिक ठिकाणी हस्तमैथुन करणं गुन्हा आहे? चला, कमीत कमी हा 'पीडित' नसलेला गुन्हा आहे' असं ट्विट तसलिमा नसरीन यांनी केलंय.
A man in a crowded Delhi bus masturbated. It should not be considered a big crime in the era of rape culture. Men should rather masturbate, than rape and murder. Is masturbating in public a crime? Well it is a victim-less crime.
— taslima nasreen (@taslimanasreen) February 12, 2018
तसलिमा यांच्या या ट्विटवर एका महिलेनं 'हे लोक आपल्या कामेच्छेवर सार्वजनिक ठिकाणी नियंत्रण ठेऊ शकत नाहीत का?' असं म्हणत प्रश्नचिन्हं उभं केलं.
तेव्हा त्याला प्रत्युत्तर देताना तसलिमा यांनी आपल्या ट्विटवर स्पष्टीकरण दिलंय. 'त्याला नियंत्रण ठेवायला हवं. हा गुन्हा नाही, असं मी म्हटलेलं नाही, हा गुन्हा आहेच परंतु, यामध्ये कुणीही पीडित नाही' असं ट्विट त्यांनी केलंय.
तर, अशा हरकती पाहणारी व्यक्ती दीर्घकाळापर्यंत हादरून जाते, असं म्हणत एका व्यक्तीनं सार्वजनिक ठिकाणी हस्तमैथुन हा देखील गुन्हाच असल्याचं म्हटलंय.