मुंबई : एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर शाळा कॉलेजचा सुट्ट्यांचा काळ सुरू होतो. त्यामुळे या दिवसात ट्रीपचं प्लॅनिंग सुरू होतं. अनेकजण पॅकेज टूरऐवजी स्वतःहून टूर प्लॅन करण्याकडे अधिक भर देतात. मग वाढत्या उन्हापासून थोडे दिवस लांब जाऊन एखादी ट्रीप प्लॅन करण्याचा विचार करत असाल तर या थंड हवेच्या ठिकाणांचा नक्की विचार करून पहा.
भारतातील काही थंड हवेची ठिकाणं
काश्मिरला भारताचे नंदनवन म्हटले जाते. काश्मिरमध्ये हिवाळ्यात बर्फात खेळण्याची जशी मज्जा असते तसेच उन्हाळ्याच्या दिवसात थंडावा अनुभवण्यासाठी काश्मिरला नक्की भेट द्या.
बर्फाळ डोंगरात अनेक खेळ आणि निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी काश्मिर हा उत्तम पर्याय आहे.
काश्मिरप्रमाणेच हिमाचलप्रदेशदेखील उन्हाळ्याच्या दिवसात पर्यटकांच्या आवडीचं एक ठिकाण आहे. हिमाचल प्रदेशामध्ये शिमला कुलू मनाली ही ठिकाणं पर्यटकांच्या आवडीची आहेत.
काश्मिरप्रमाणेच मनाली, रोहतांग या परिसरातही बर्फात खेळण्याची संधी मिळते.
उत्तराखंड परिसरामध्ये मसुरी ही पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ आहे. मसुरीमध्ये अनेक निसर्गरम्य ठिकाणं आहेत. येथे तुम्ही शांतपणे फिरू शकता सोबत उन्हापासून दूर मस्त निसर्गरम्य ठिकाणाचा आनंद घेऊ शकता.
तुम्ही चहाचे शौकिन असाल आणि सोबतच पर्यटन हा तुमचा आवडता विषय असाल तर दार्जलिंग हे उत्तम पर्यटनस्थळ आहे. दार्जलिंगमध्ये चहाचे मळे पाहणं आणि सोबतच हिल स्टेशनवर काही काळ राहणं हा अनुभव सुखावह असतो. या ठिकाणी तुम्ही टॉय ट्रेनच्या माध्यमातूनही फिरू शकता. टॉय ट्रेनचा आनंद लुटणं हा अनुभव फारच मस्त ठरणार आहे.
घनदाट जंगलातील निसर्गसौंदर्य अनुभवायचे असल्यास नैनीताल हे उत्तम पर्यटनस्थळ आहे. उन्हाळ्यात फिरण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.