Corona Cases in India : केंद्रीय गृहमंत्रालयानं 31 मार्चपासून कोरोना (Corona) आटोक्यात आणण्यासाठी पॅण्डेमिक अॅक्टअंतर्गत (pandemic act) सर्व निर्बंध हटवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन (Lockdown), कटेन्मेंट झोन (containment zone) इत्यादी गोष्टी इतिहासजमा होणार असल्या तरी धोका अद्याप पूर्ण टळलेला नसल्याचं गेल्या 5 दिवसांतील आकडेवारी सांगतेय. 20 मार्चपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ बघायला मिळतेय.
20 मार्चला देशात 1 हजार 761 कोरोनाबाधित आढळले होते. 21 मार्चला यात घट होऊन 1 हजार 549 हा तिसऱ्या लाटेतला निचांक नोंदवला गेला. मात्र तिसऱ्या दिवशी त्यात थोडी वाढ झाली. 23 मार्चला रुग्णांचा आकडा 1 हजार 778 वर गेला. तर गुरूवारी 1 हजार 938 नवे रुग्ण आढळलेत.
या काळात मृतांचा आकडाही वाढतोय. 21 आणि 22 मार्चला प्रत्येकी 33 जणांचा बळी गेला होता. 23 तारखेला हा आकडा जवळजवळ दुप्पट झाला. तर 24 तारखेलाही तब्बल 67 जणांचा मृत्यू झाला.
ही वाढ मोठी नसली तरी आतापर्यंतच्या तीन लाटांचा अनुभव पाहता त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे 31 मार्चपासून सर्व निर्बंध हटणार असले तरी मास्क, सॅनिटायझरचा वापर, वेळोवेळी हात धुणं या गोष्टी करायलाच हव्यात, असं केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पष्ट केलंय.
आता मास्क वापरण्याची गरज नसल्याचे मेसेज सोशल मीडियात व्हायरल होत असले तरी ते खोटे असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. उलट केंद्र सरकारनं राज्यांना पत्र पाठवलं असून त्यात मास्कचा (Mask) वापर, टेस्टिंग अँड ट्रेसिंग (testing and tracing) आणि लसीकरण (Vaccination) यावर भर देण्याचा आग्रह धरलाय.
निर्बंध हटले म्हणून तुम्हीही गाफील राहू नका. कोरोनाचे नवनवे व्हेरियंट (Corona Variant) कोणत्या कोपऱ्यावर दबा धरून बसले असतील याचा नेम नाही. कोरोनावर संपूर्ण मात केली जात नाही तोपर्यंत धोका कायम आहे.