लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेऊ नका नाहीतर तुम्हाला... सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना पुन्हा धमकी

Sidhu Moose Wala case : गेल्या वर्षी मे महिन्यात प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. थारमधून जात ्असलेल्या सिद्धू मुसेवालावर दोन गाड्यांमधून आलेल्या आरोपींनी बेछुट गोळीबार केला.

Updated: Mar 26, 2023, 05:33 PM IST
लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेऊ नका नाहीतर तुम्हाला... सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना पुन्हा धमकी title=

Sidhu Moose Wala case : मुलानंतर आपल्यालाही मारून टाकण्याची धमकी दिल्याचा दावा प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) याचे वडील बलकौर सिंग (balkaur singh) यांनी रविवारी केला आहे. पुन्हा एकदा ई-मेलद्वारे (Email) जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत असा आरोप बलकौर सिंग यांनी केली आहे. राजस्थानमधून (rajasthan) मला लवकरच मारुन टाकले जाईल असा धमकीचा ईमेल आला आहे. मला लॉरेन्स बिश्नोईचे (Lawrence Bishnoi) नाव घेऊ नका असे सांगण्यात आले आहे, असे बलकौर सिंग यांनी म्हटले आहे. यापूर्वी 25 एप्रिल रोजीसुद्धा मला जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचा आरोप सिद्दू मुसेवालाच्या वडिलांनी केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा धमकीचा ईमेल आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

धमकी देणाऱ्या व्यक्तीने बलकौर सिंग यांना लॉरेन्सचे नाव घेणे थांबवा अन्यथा तुम्हाला ठार मारू, अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही बलकौर सिंग यांना इन्स्टाग्रामवर धमक्या आल्या होत्या. त्यानंतर एका अल्पवयीन मुलाला जोधपूर येथून ताब्यात घेण्यात आले होते. पोलिसांनी या मुलाकडून एक मोबाईल जप्त केला होता.

मी लढत राहणार - बलकौर सिंग

या धमकीच्या ईमेलनंतरही बलकौर सिंग यांनी आपण आरोपींविरुद्ध लढतच राहणार असल्याचे म्हटले आहे. "माझी काय चूक आहे? मी माझ्या मुलाची केस लढू नये का? मला 18, 24 आणि 27 फेब्रुवारीला धमकी देण्यात आली होती की, 25 एप्रिलपूर्वी मला ठार मारले जाईल. मला सरकारला सांगायचे आहे की माझी सुरक्षा काढून घ्या. तरीसुद्धा मी लढत राहील," असे बलकौर सिंग यांनी म्हटले आहे.

लॉरेन्स बिश्नोई जेलमध्ये बसून धमकी देतोय - बलकौर सिंग

काही दिवसांपूर्वीच सिद्धू मुसेवालाची पहिली पुण्यतिथी मानसाच्या दाणा मंडीत साजरी करण्यात आली. यावेळी वडील बलकौर सिंग यांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने दिलेल्या मुलाखतीवर निशाणा साधला होता. "एक गुंड स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवून घेत आहे. तुरुंगात बसून तो म्हणतो की मी सिद्धूला मारले आहे आणि सलमानला मारणार आहे. माझा मुलगा सिद्धूच्या हत्येचा मुख्य सूत्रधार, गँगस्टर गोल्डी ब्रार अद्याप पोलिसांपर्यंत पोहोचला नाही," असे बलकौर सिंग यांनी म्हटले होते.

कोर्टात जाणे बंद केले

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात आपण कोर्टात जाणे बंद केल्याचे बलकौर सिंग यांनी सांगितले. या खटल्याच्या तारखांनाही कोर्टात जाणे बंद केले आहे. आता न्याय मागण्यासाठी अधिकाऱ्यांच्या कार्यालयातही जात नाही.  आता देवावर श्रद्धा आहे. आरोपींना फक्त देवच शिक्षा देईल, असे बलकौर सिंग म्हणाले.

दरम्यान, गेल्या वर्षी सिद्धू मुसेवालाची 29 मे रोजी संध्याकाळी 5.30 वाजता मानसाच्या जवाहरके गावात हत्या करण्यात आली होती. मुसेवालावर सुमारे 40 गोळीबार झाडण्यात आला. मुसेवाला याच्या शरीरावर 19 जखमा आढळल्या होत्या. यातील 7 गोळ्या थेट मुसेवालाला लागल्या होत्या. गोळी लागल्यानंतर काही मिनिटांत मुसेवालाचा मृत्यू झाला होता.