'रामाच्या नावावर विश्वासघात केल्याचं फळ....'

'हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार' 

Updated: Dec 12, 2018, 02:22 PM IST
'रामाच्या नावावर विश्वासघात केल्याचं फळ....'  title=

मुंबई :  देशाच्या राजकीय पटलावर इतक्या घडामोडी सुरु असतानाच दुसरीकडे नवी दिल्ली येथे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनातच्या पहिल्याच दिवशी अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेना पक्षनेते आक्रमक असल्याचं पाहायला मिळालं. 

'राम मंदिराचा मुद्दा मांडण्याची संधी द्या', अशी नोटीस शिवसेना खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे. 'हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार' अशी घोषवाक्य लिहिलेले फलक घेऊन हिवाळी सत्र होत असणाऱ्या संसदेच्या सदनाबाहेर शिवसेनेच्या नेतेमंडळींनी आपला मुद्दा मांडला. 

'हे विधेयक मांडू न दिल्यास संसदेचं कामकाज सुरळीत चालू देणार नाही', असा इशाराही शिवसेना खासदारांकडून देण्यात आला. अध्यादेश आणला तरच राम मंदिर उभं राहील असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपलं मत मांडलं.

अभी नही तो कभी नही', असं म्हणत त्यांनी राम मंदिराविषयीचा आपला पवित्रा माध्यमांशी बोलताना मांडला. रामाच्या नावावरुन भाजपाच्या वाट्याला इतकं बहुमत आलं आहे. त्यामुळे निदान त्याच्या नावाचा वापर करुन विश्वासघात करु नका असं सूचक विधान त्यांनी केलं. 

राऊत यांनी केलेल्या या विधानाच्या माध्यमातून त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडल्याचं पाहायला मिळालं. धर्माचं राजकारण करत आतापर्यंत भाजपाला सत्ता स्थापन करण्यात यश मिळालं असलं तरीही नुकत्याच पाच राज्यांच्या विधनसभा निवडणुकांचा ननिकाल पाहता भाजपाची खरी स्थिती स्पष्टच होत आहे, याकडेच त्यांच्या वक्तव्याचा रोख होता. त्यामुळे शिवसेना खासदारांची ही मागणी हिवाळी अधिवेशनात मान्य होणार की, कामकाजात अडथळा येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

AssemblyElections