मुंबई - गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जी आश्वासने दिली होती. ती गेल्या साडेचार वर्षांत त्यांनी पूर्ण केलेली नाहीत. या काळात त्यांनी घेतलेल्या विविध निर्णयांवर लोक नाराज आहेत. यामुळेच पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपला लोकांनी नाकारले, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी मांडले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
शरद पवार म्हणाले, भाजपच्या गेल्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात देशातील महत्त्वाच्या संस्थांच्या स्वायत्ततेवर हल्ला करण्यात आला. रिझर्व्ह बॅंकेच्या गर्व्हनरांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिला. सीबीआयच्या प्रमुखांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना इतिहासात पहिल्यांदाच पत्रकार परिषद घ्यावी लागली. हे सर्व देशातील लोकं पाहात आहेत. त्याचा परिणाम निवडणुकीत झाला. जी आश्वासने लोकांना दिली होती. ती आता भाजप विसरला आहे. अर्थशास्त्रातील जाणकारांना न विचारताच नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. याचा फटका अर्थव्यवस्थेला बसला.
भाजपकडून निवडणूक प्रचारात एकाच कुटुंबावर सातत्याने हल्ला करण्यात येतो. आजच्या तरुण पिढीने पंडीत नेहरू, इंदिरा गांधी यांना पाहिलेले नाही. राहुल गांधी आणि सोनिया गांधी सत्तेत नाही. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणे लोकांना भावले नाही. आता परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. संसदीय लोकशाही मजबूत करणारा हा निर्णय आहे. काँग्रेसने नव्या पिढीकडे सोपविलेले नेतृत्त्व लोकांना आवडले आणि ते त्यांनी स्वीकारले आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले. पुढील लोकसभेच्या निवडणुकीत देशातील चित्र बदललेले असेल, असेही भाकीत शरद पवार यांनी केले.