किमान मुद्दल सुरक्षित करा; SEBI च्या इशाऱ्यानंतर गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी

Share Market SEBI on Small and Mid Cap  : फुगा फुटयची वाट बघू नका, किमान मुद्दल सुरक्षित करा, कुठे कधी काय खाली पडेल सांगता येत नाही...   

निनाद झारे | Updated: Mar 12, 2024, 09:57 AM IST
किमान मुद्दल सुरक्षित करा; SEBI च्या इशाऱ्यानंतर गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी title=
Sebi chief flags bubble in midcap smallcap space what are the precautions to be taken care of for investors

निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : तुम्ही शेअर बाजारातल्या स्मॉल आणि मिडकॅप कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले असतील, किंवा तुमच्या एसआयपीच्या पोर्टफोलिओत तर सेबीने दिलेला इशारा महत्वाचा आहे. सेबीच्या प्रमुख माधवी पुरी-बुच यांनी शेअर बाजारातील मध्यम आणि छोट्या कंपन्यांच्या शेअर किंमतीत झालेल्या अव्वाच्या सव्वा वाढीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. (Share Market SEBI on Small and Mid Cap)

अनेक कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत गेल्या सहा महिन्यात वारेमाप वाढ झाली आहे. कंपन्यांचे ताळेबंद अशा किंमती देण्याइतपत खरोखर सक्षम आहेत का याची शहानिशा न करताच गुंतवणूक होत असल्याचं सेबी प्रमुखांच्या इशाऱ्यामागचं कारण आहे. मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये बाजाराच्या भाषेत मोठा 'बबल' (बुडबुडा) तयार होत असल्याने सगळ्यांनी गुंतवणूक करताना योग्य ती सावधगिरी बाळगावी असं बुच यांनी म्हटलंय. 

सेबीला मिड-स्मॉल कॅपविषयी चिंता का वाटतेय?

गेल्या पाच सहा महिन्यांपासून शेअर बाजारातल्या तेजीला परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली खरेदी जबाबदार आहे. देशांतर्गत गुंतवणूकदारांनीही गेल्या दोन वर्षात स्मॉल आणि मिड कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपी (SIP) च्या माध्यमातून सातत्याने गुंतवणूक केली आहे. पण परेदेशी गुंतवणूकदार किंवा म्युच्युअल फंड दोन्हींची गुंतवणूक कंपनीची आर्थिक स्थिती आणि इतर परिमाणं जपून करण्यात येते. गेल्या पाच सहा महिन्यात मात्र स्थिती बदलली आहे. नव्याने बाजारात येणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या मोठी आहे. अशा गुंतवणूकदारांना शेअर बाजारातील गुंतवणुकीत आत्मसात असलेल्या जोखमीची फारशी जाणीव नसते. 

अनेकदा असे नवे गुंतवणूकदार सोशल मीडियावरुन व्हायरल होणाऱ्या माहितीच्या आधारे कमी किंमतीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. सोशल मीडियावरील रिल्समध्ये कंपनीच्या भूतकाळातील नफ्या तोट्याचा ताळेबंद मांडणे प्रत्येकवेळी शक्य नसते. त्यामुळे नवे गुंतवणूकदार अगदी कमी किंमतीत मिळणाऱ्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक करुन बसतात. 

2023 च्या सुरुवातीपासून तर आजतागायत अशाच्या फायद्यात नसणाऱ्या आणि भविष्यविषयी कमालीची अस्थितरता असणाऱ्या अनेक कंपन्यांमध्ये त्या फक्त कमी किंमतीत मिळतायत म्हणून गुंतवणूक झाली आहे. अशा बहुतांश कंपन्यांच्या शेअरचे भाव आजही चढेच आहेत. याच अकारण वाढलेल्या शेअर्समधील गुंतवणूकीविषयी सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी-बुच यांनी चिंता व्यक्त केली आहे.

तुमची गुंतवणूक धोक्यात आहे हे कसं ओळखाल?

आता तुम्ही म्हणाल, आम्ही तर गुंतवणूक करुन बसलोय... नफा ही होतोय मग ही गुंतवणूक ही गुंतवणूक धोक्यात आहे की नाही हे कसं ओळखायचं? या प्रश्नाची उत्तरही इथं पाहून घ्या...

तुमच्या गुंतवणूकीचं आरोग्य तपासण्यासाठी काही निकष आहेत. हे निकष तुम्ही तुमच्या कंपनीला लावलेत, तर तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे की धोक्यात हे सहज ओळखू शकता. 

हे निकष खालीलप्रमाणं... 

  • कंपनीने गेल्या चार तिमाहीत जाहीर केलेला ताळेबंद. गेल्या चार तिमाही निकालांमध्ये जर कंपनी फायद्यात असेल, आणि नफ्याची टक्केवारी (मार्जिन) वाढत असेल किंवा स्थिर असेल तर, कंपनीचा P/E रेशो- हा जर 25 ते 30 च्या दरम्यान असेल तर तुमची गुंतवणूक पुरेशी सुरक्षित आहे. 
  • कंपनीचा प्राईस टू बुक रेशो- हा रेशो जर 1 पेक्षा कमी असेल, तर कंपनीची सध्याची किंमत फारशी जोखमीची नाही. अन्यथा मात्र कंपनीच्या शेअर बाजारातील किंमत वाजवी पेक्षा जास्त आहे. 
  • कंपनीवरील डेब्ट टू इक्विटी रेशो- मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांसाठी हा रेशो 1.5 ते 2 च्या मध्ये असणे श्रेयस्कर असते. जर हा रेशो 2 च्या वर असेल, तर मात्र तुम्ही गुंतवणूक केलेल्या कंपनीची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही हे ओळखून योग्य तो विचार वेळीच केला पाहिजे
  • शेअर बाजारात असणारा कंपनीचा फ्लोटींग स्टॉक- तुम्ही गुंतवणूक केलेल्या कंपनीच्या एकूण शेअर्स पैकी शेअर बाजारात किती शेअर्स खेळते आहेत. हेही जोखमी तपासताना महत्वाचे आहे. 
  • जर कंपरनीचा फ्लोटिंग स्टॉक कमी असेल, तर अशा कंपनींतून गुंतवणूक काढणे कठीण होऊ शकते. त्यामुळे जर तुमची गुंतवणूक नफ्यात असेल, तर अशा गुंतवणूकीतून बाहेर पडून चांगल्या फ्लोटिंग स्टॉक असणाऱ्या कंपनीत गुंतवणूक करायला हवी. 

हेसुद्धा वाचा : Loksabha Election : लोकसभेतील खासदारांचा हजेरीपट समोर; दांडी मारणारे कितीजण माहितीयेत?

सेबीच्या इशाऱ्यानंतर वरील पाच निकष लावून तुम्ही तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे की धोक्यात हे तपासून पुढील निर्णय घेऊ शकता. या निकषांशिवाय तुमच्या गुंतवणूकीविषयी निर्णय घेण्याआधी सल्लागाराशी पुन्हा एकदा चर्चा करा आणि मगच काय तो निर्णय घ्या.