नवी दिल्ली : सारा देश होळीच्या रंगात नाहून निघालेला असताना याच उत्साहात प्रत्येकजण त्यांच्या परीने या अनोख्या सणाच्या शुभेच्छा देत आहे. आनंदाच्या आणि उत्साहाच्या या पर्वाची शोभा आणखी वाढवून जात आहे ते म्हणजे वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी साकारलेलं वाळूशिल्प.
रंगाच्या अनोख्या छटा आणि आनंदाची बरसात करणाऱ्या या सणाचा संदर्भ देत त्यांनी हे भव्य असं वाळूशिल्प साकारलं आहे. ज्यामध्ये राधा- कृष्णाची प्रतिकृती पाहायला मिळत आहे. केंद्रस्थानी राधा आणि कृष्णाचे चेहरे सांकारत त्याच्या आजूबाजूला सुरेख आणि तितक्याच विविध रंगांच्या छटा या वाळूशिल्पाच्या माध्यमातून साकारण्यात आल्या आहेत. होळी हा सण साजरा करतेवेळी त्यात कृष्ण आणि राधेच्या प्रेमाचेही काही दाखले आणि प्रसंग रंगवले जातात. याचीच प्रचिती पटनायक यांचं हे वाळूशिल्प पाहताना होत आहे.
Namaskar! A very happy, colourful and Joyful holi... #HappyHoli2019 pic.twitter.com/SJGPeQxVQe
— Sudarsan Pattnaik (@sudarsansand) March 20, 2019
वाईटावर चांगल्या कामांचा आणि सकारात्मकतेचा विजय हा होळीच्या सणामागचा संदेश आहे. असा हा अनेकांनाच महत्त्वाची शिकवण देणारा आणि आयुष्यात आनंदाचा शिडकावा करणारा सण देशभरातील विविध राज्यांमध्ये तितक्याच बहुविध पद्धतींनी साजरा केला जात आहे. लठमार होळी, कपडा फाड होळी, शिमगा अशा असंख्य नावांनी आणि रुपांनी ओळखला जाणारा हा सण, पटनायक यांनी खऱ्या अर्थाने त्यांच्या या वाळूशिल्पात एकवटला आहे, असंच प्रतित होत आहे. कारण, कृष्णाच्या लीला आणि त्याचं अस्तित्व हे चराचरात आहे, हीच अनेकांची धारणा आहे.