लंडनमधील सर्वात कुख्यात तुरुंगात नीरव मोदीची रवानगी

इंग्लंडमधील सर्वात कुख्यात तुरुंग म्हणून वर्डसवर्थ एचएमची ओळख आहे. 

Updated: Mar 21, 2019, 10:30 AM IST
लंडनमधील सर्वात कुख्यात तुरुंगात नीरव मोदीची रवानगी title=

नवी दिल्ली: पीएनबी बँकेला तब्बल १२ हजार कोटींचा चुना लावणारा हिरे व्यापारी नीरव मोदी याला बुधवारी लंडनमध्ये अटक करण्यात आली. यानंतर नीरव मोदीची रवागनी लंडनमधील सर्वात कुख्यात कारागृहामध्ये करण्यात आल्याचे समजते. काही दिवसांपूर्वीच 'द टेलिग्राफ' या वृत्तपत्राने लंडनमध्ये नीरव मोदी अलिशान जीवन जगत असल्याची माहिती जगासमोर आणली होती. यानंतर अनेकांनी केंद्र सरकारला जाब विचारायला सुरुवात केली होती. त्यामुळे भारतीय तपासयंत्रणांनी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या. अखेर काल लंडनच्या एका बँकेतून नीरव मोदी याला ताब्यात घेण्यात आले. 

पोलिसांनी नीरवला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी नीरवने जामीनावर सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, न्यायालयाने जामीनाचा अर्ज फेटाळत २९ मार्चपर्यंत नीरवला कोठडी सुनावली आहे. यानंतर नीरवची रवानगी वर्डसवर्थ एचएम तुरुंगात करण्यात आली. इंग्लंडमधील सर्वात कुख्यात तुरुंग म्हणून वर्डसवर्थ एचएमची ओळख आहे. कडक कायदे आणि शिक्षांमुळे येथील कैद्यांचे जीवन म्हणजे नरकयातना असतात. जवळपास २२ तास कैद्यांना त्यांच्या तुरुंगातच ठेवले जाते. अनेक कैद्यांना जबर मारहाणही झाल्याच्या घटना मध्यंतरी समोर आल्या होत्या. लंडनमधील अनेक अट्टल गुन्हेगारांना या तुरुंगात ठेवण्यात आले आहे. ही एकूणच परिस्थिती पाहता भारताच्या ताब्यात जाण्यापूर्वीच नीरव मोदीचा वाईट काळ सुरु झाल्याची चर्चा सुरु आहे. 

नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेसाठी जास्तीत जास्त सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. सीबीआय आणि ईडी यांनी यापूर्वीच नीरव मोदीविरोधात न्यायालयात सविस्तर आरोपपत्र सादर केले आहे. यामध्ये नीरव मोदीने 'पीएनबी'कडून कर्ज घेताना सादर केलेल्या खोट्या ‘लेटर ऑफ अंडरटेकिंग (एलओयू)’, ईमेल्स आणि बनावट कंपन्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केल्याच्या पुराव्यांचा समावेश आहे. ही कागदपत्रे यापूर्वीच इंग्लंडमधील अधिकाऱ्यांना देण्यात आली होती.