रिलायन्स AGM मध्ये जे आज घडलं ते 2 वर्षांपूर्वीच ठरलं! अंबानींच्या डोक्यात नेमकं काय? येथे वाचा

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या 46 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मुकेश अंबानी यांनी बोर्डात महत्वपूर्ण बदल केले जात असल्याची घोषणा केली आहे. ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी या तिघांनाही बोर्डात समाविष्ट करण्यात आलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 28, 2023, 05:05 PM IST
रिलायन्स AGM मध्ये जे आज घडलं ते 2 वर्षांपूर्वीच ठरलं! अंबानींच्या डोक्यात नेमकं काय? येथे वाचा title=

रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे जगातील श्रीमंत उद्योजकांच्या यादीत आहेत. मुकेश अंबानी यांना वडिल धीरुभाई अंबानी यांच्याकडून वारस मिळाला असला तरी आज ते स्वत:च्या मेहनतीवर उभे आहेत. दरम्यान, वडिलांच्या संपत्तीवरुन अंबानी बंधूंमध्ये झालेला वाद हा सर्व जगाने पाहिला आहे. हा असाच वाद आपल्या मुलांमध्ये होऊ नये यासाठी मुकेश अंबानी फार आधीपासूनच प्रयत्न करत आहेत. याचाच भाग म्हणून आज मुकेश अंबानी यांनी आज पायाभरणी करत एक महत्त्वाची घोषणा केली. 

आजच्या AGM मध्ये काय घडलं?

मुकेश अंबानी यांनी बोर्डात महत्वपूर्ण बदल केले जात असल्याची घोषणा केली. संचालक मंडळाने ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांना बोर्डात बिगर कार्यकारी संचालक (Non Executive Director) म्हणून मंजुरी दिली आहे. भागधारकांच्या मंजुरीनंतर ही नियुक्ती अधिकृतपणे होईल. दरम्यान, यासह नीता अंबानी संचालक मंडळातून बाहेर पडल्या आहेत. 

मुकेश अंबानींकडून नवे वारसदार घोषित, पत्नी नीता अंबानींचा राजीनामा; रिलायन्सच्या AGM मध्ये मोठा निर्णय

 

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना तीन मुलं आहेत. ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी हे तिघेही रिलायन्सच्या उद्योगांमध्ये सक्रीय सहभाग नोंदवत असून महत्त्वाची पदं भूषवत आहेत. पण भविष्यात आपल्यानंतर मुलांमध्ये संपत्तीवरुन भांडणं होऊ नयेत यासाठी मुकेश अंबानी प्रयत्नशील आहेत. यासाठी त्यांनी अब्जाधीशांनी आपल्या संपत्तीचं वाटप कसं केलं होतं याचा अभ्यास फार आधीच सुरु केला होता. दरम्यान ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी या तिघांनाही बोर्डात समाविष्ट करणं हा त्याचा योजनेचा भाग असल्याची शक्यता आहे. 

मुकेश अंबानी यांनी केली होती दोन योजनांची निवड

मुकेश अंबानी यांनी जेव्हा संपत्ती वाटपासंबंधी अभ्यास सुरु केला होता तेव्हा त्यांना दोन योजना आवडल्या होत्या. यामध्ये त्यांना दोन योजना आवडल्या होत्या. यामधील पहिल्या योजनेत होल्डिंग ट्रस्टमध्ये टाकणे होतं. यानुसार ट्रस्टच्या माध्यमातून रिलायंस इंडस्ट्रीजला नियंत्रित करणं. या ट्रस्टमध्ये मुकेश अंबानींसह त्यांच्या कुटुंबाचा वाटा असेल. सर्वजण ट्रस्टचे सदस्यही राहतील. बोर्डामध्ये अंबानी कुटुंबातील सर्वात जवळच्या सदस्यांना देखील समाविष्ट करून घेतले जाईल. यानंतर रिलायंस कंपनी एका प्रोफेशनल मॅनेजमेंटच्या माध्यमातून चालवली जाणार.

पण सध्याचा निर्णय पाहता मुकेश अंबानी यांनी वॉलमार्टचे वॉल्टन यांच्या योजनेला पसंती दिल्याचं दिसत आहे. ही योजना नेमकी आहे हे जाणून घ्या...

वॉलमार्ट कंपनीचे संस्थापक सॅम वॉल्टन यांच्या मृत्यूनंतर त्यांनी उभारलेलं उद्योगाचं साम्राज्य हस्तांतरित करण्यासाठी एक योजना आखण्यात आली होती. वॉल्टन यांनी 1988 पासूनच आपले दैनंदिन व्यवसाय व्यवस्थापकांच्या हाती सुपूर्द करण्यास सुरुवात केली होती. यानंतर एक संचालक मंडळ स्थापन करण्यात आलं होतं. हे संचालक मंडळ व्यवस्थापकांच्या कामावर नजर ठेवत होतं. 

सॅम यांचे ज्येष्ठ सुपूत्र रॉब वॉल्टन आणि त्यांचे पुतणे स्टुअर्ट वॉल्टन यांना संचालक मंडळात घेण्यात आलं होतं. सॅम यांनी मृत्यूच्या 40 वर्ष आधीच वारसदार निवडण्याची योजना आखण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार त्यांच्या निधनानंतर उद्योगातील 80 टक्के भाग 4 मुलांमध्ये वाटून देण्यात आला होता.

मुकेश अंबानींचा मुलांना संचालक मंडळात घेण्याचा निर्णय पाहिला तर तेदेखील सध्या याचप्रमाणे आपली वारसदार योजना आखत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे भविष्यात मुकेश अंबानी यांनी उद्या पायऊतार होत फक्त बाहेरुन लक्ष ठेवण्याची भूमिका निभावण्याचा निर्णय घेतला तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.