घरातल्या पिठाच्या गिरणीने घेतला चौघांचा बळी; नातवांना पाहायला आलेल्या आजोबांचाही मृत्यू

Rajasthan News : राजस्थानमध्ये पीठ गिरणीमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे. या घटनेमुळं परिसरात शोककळा पसरली आहे.

आकाश नेटके | Updated: Sep 2, 2023, 01:24 PM IST
घरातल्या पिठाच्या गिरणीने घेतला चौघांचा बळी; नातवांना पाहायला आलेल्या आजोबांचाही मृत्यू title=

Accident News : एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना राजस्थानमधून (Rajasthan News) समोर आला आहे. राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यात शुक्रवारी एका घरगुती पिठाच्या गिरणीतून (Flour Mill) वीजेचा धक्का लागल्याने एकाच कुटुंबातील दोन मुलांसह चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Rajasthan Police) घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

हा सगळा प्रकार शुक्रवारी राजस्थानच्या ताना जिल्ह्यातील आरंग गावाजवळील रामदेवपूरमध्ये घडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अनिल सरन आणि शिव पोलीस ठाण्याचे अधिकारी चुन्नीलाल यांनी घटनास्थळ गाठले. पोलीस उपअधीक्षक अनिल सरन यांनी सांगितले की, अर्जुन सिंह नावाच्या व्यक्तीच्या घरात हा प्रकार घडला. यामध्ये त्याची पत्नी छेलू कंवर (23), त्यांची दोन मुले आणि सासरा हठेसिंह (55) यांचा घरातील पिठाच्या गिरणीतून विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.

शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पत्नी छेलू कंवर पिठाच्या गिरणीत पीठ दळत होती. यादरम्यान तिला विजेचा धक्का बसला. आईला ओरडताना पाहून दोन्ही मुले तिथे पोहोचली तेव्हा त्यांनाही विजेचा धक्का बसला. मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या आजोबांनाही विजेचा धक्का लागला आणि त्यांचाही मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन सिंह त्याच्या भावावर उपचार करण्यासाठी दिल्ली एम्समध्ये गेला होता. मुलीला भेटायला आलेल्या हठेसिंग यांचाही या घटनेत मृत्यू झाला आहे. अपघाताच्या वेळी चौघांव्यतिरिक्त अर्धांगवायू झालेल्या मुलांचे आजोबा घरी होते. त्यांना चालता येत नसल्यामुळे ते बचावले आहेत. छेलू कंवर या दळण दळत असताना गिरणीमध्ये विद्युत प्रवाह उतरला. त्यामुळे छेलू कंवरला विजेचा धक्का बसला. त्यानंतर आई पाहून मुलेही तिच्याकडे धावली तर त्यांनाही विजेचा धक्का बसला. आवाज ऐकून हठेसिंहदेखील मदतीला धावले. त्यामुळे तेही विजेच्या प्रवाहाच्या कचाट्यात आले.

शेजाऱ्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी डिस्कॉमला फोन करून वीजपुरवठा बंद केला आणि पोलिसांना कळवले. या घटनेनंतर डिस्कॉमवर निष्काळजीपणाचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. डिस्कॉमने एकाच खांबावर सिंगल फेज लाईनसह थ्री-फेज हाय व्होल्टेज लाईन बसवल्याचे गावकऱ्यांचे म्हणणं आहे. त्यामुळे घरगुती कनेक्शनमध्ये उच्च व्होल्टेजचा प्रवाह येतो. त्यामुळे हा अपघात झाला आणि चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.