दिल्ली हादरली! 82 वर्षीय महिलेवर तरुणाचा अत्याचार; ब्लेडने ओठ कापले

Delhi Crime : दिल्लीत एका वृद्ध महिलेवर तरुणाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी 28 वर्षीय आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. आरोपीने महिलेचे ओठ देखील कापले आहेत.

आकाश नेटके | Updated: Sep 2, 2023, 10:40 AM IST
दिल्ली हादरली! 82 वर्षीय महिलेवर तरुणाचा अत्याचार; ब्लेडने ओठ कापले title=
(प्रातिनिधीक छायाचित्र - PTI)

Delhi Crime : दिल्लीत (Delhi News) पुन्हा एक हादरवणारी घटना समोर आली आहे. दिल्लीत एका वृद्ध महिलेवर तरुणाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी (Delhi Police) याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. या घटनेनंतर दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) प्रमुख स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, आरोपीने घरात झोपलेल्या वृद्ध महिलेवर बलात्कार केल्यानंतर तरुणाने तिचे ओठही ब्लेडने कापले. सध्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर दिल्ली पुन्हा हादरली आहे.

दिल्लीतील नेताजी सुभाष प्लेस परिसरात शुक्रवारी एका 85 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेच्या संदर्भात 28 वर्षीय आकाश नावाच्या आरोपीला अटक केली. याची माहिती दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी दिली आहे. स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांना याप्रकरणाची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

शुक्रवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास वृद्ध महिला घरात झोपली असताना ही घटना घडली. आरोपीने महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. त्याने महिलेला बेदम मारहाण केली आणि ब्लेडने तिचे ओठ कापले. मिळालेल्या माहितीनुसार, वृद्ध महिलेच्या गुप्तांगाला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी 28 वर्षीय आरोपी आकाशला अटक केली आहे.

डीसीडब्ल्यूच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनीसुद्धा या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी एका ट्विटमध्ये दिल्ली पोलिसांकडून एफआयआरची प्रत मागितली आहे. याशिवाय त्यांनी दिल्ली पोलिसांना या प्रकरणाची इतर माहिती महिला आयोगाला सांगण्यास सांगितले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.