Accident : बाईकस्वाराचं हेल्मेट पडलं आणि कारमधल्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला. ही काहीशी हैराण करणारी घटना आहे. पण राजस्थानमधल्या (Rajasthan) सीकर जिल्ह्यात झालेल्या एका विचित्र रस्ते अपघातात (Road Accident : एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. ज्या बाईकस्वाराचं रस्त्यात हेल्मेट पडलं त्याला साधं खरचटलंही नाही. पण कारमधल्या चार जणांचा मात्र मृत्यू झाला. मृतामध्ये दोन वृद्धांचा आणि दोन तरुण मुलांचा समावेश आहे. या अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
कसा झाला अपघात?
वास्तविक हे चार जण ज्या कारने प्रवास करत होते. कारच्या पुढे एक तरुण बाईक (Motor Cycle) चालवत होता. बाईक चावताना त्याचं हेल्मेट खाली पडलं आणि त्याने अचानक ब्रेक दाबला. बाईक थांबलेली पाहून कार चालकाने ब्रेक लावला. पण मागून येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली. हा अपघात इतका भयाणक होता की कारमधल्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
आजी, मुलगा आणि नातवांचा मृ्त्यू
मृतांमध्ये 80 वर्षांची वृद्ध महिला, तिचा मुलगा आणि आणि तिची दोन नातवंडांचा समावेश आहे. या चारही जणांवर त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांच्या तपासात अपघाताचा हा सर्व घटनाक्रम समोर आलाय.
उपचारासाठी जात होते जयपूरला
राजस्थानमधल्या सीकर जिल्ह्यातील झुंझुनू जिल्ह्यात राजकुमार मीणा हे आपल्या कुटुंबासह राहतात. राजकुमार यांची 80 वर्षांची आई संज्या देवी यांच्या उपचारसाठी ते आपली 20 वर्षांची मुलगी अर्चना आणि मुलगा आझाद यांना घेऊन कारने जयपूरला निघाले. यासाठी चारही जण सकाळी लवकर घरातून बाहरे पडले. पण सीकरमधल्या रिंगस या ठिकाणी त्यांच्या कारला अपघात झाला आणि चारही जणांचा मृत्यू झाला.
बाईकमुळे भीषण अपघात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाईकस्वाराने अचानक ब्रेक मारल्याने कार चालवत असलेले राजुकमार मीणा हे गोंधळले. बाईकस्वाराला वाचवण्याच्या नादात त्यांनी कारचा इमरजेंन्सी ब्रेक दाबला. पण कारच्या मागून सीमेंट वाहून नेणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. बाईकस्वाराच्या एका चुकीमुळे हा अपघात घडला आणि चार जणांचा मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बाईकस्वाराने हेल्मेट बाईकच्या हँडलला लटकवलं होतं. बाईक चालवताना हेल्मेट रस्त्यावर पडलं. ते घेण्यासाठी त्याने रस्त्याच्या मध्येच बाईक थांबवली. त्यामुळे पुढची सर्व घटना घडली. एकाच वेळी चार जणांच्या मृत्यूने कुटुंबावर आणि गावात शोककळा पसरली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.