नवी दिल्ली : सध्या देशभरात फिट इंडिया मोहिमेची धूम सुरू असताना, या मोहिमेला आता राजकीय वळण लागलंय.... भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन विराट कोहलीनं दिलेलं फिटनेसचं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वीकारलं... हाच धागा पकडून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वेगळंच आव्हान दिलंय... हे आव्हान आहे पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ कमी करण्याचं..
देशात फिटनेसबाबत जागरुकता करण्यासाठी क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यात राठोड यांनी खेळ आणि सिनेमा जगतातील महत्त्वाच्या व्यक्तींना टॅग करत या अभियानात सामील होण्यास सांगितले होते. या व्हिडीओला सोशल मीडियावर जबरदस्त प्रतिसाद मिळतोय.राठोड यांनी भारताचा कर्णधार विराट कोहलीलाही चॅलेंज दिले होते. विराटनेही हे चॅलेंज स्वीकारले होते. तो म्हणाला, मी हे चॅलेंज स्वीकारतो. मात्र त्याबरोबरच मी माझी पत्नी अनुष्का, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाऊ धोनीला हे आव्हान स्वीकारण्याचे आवाहन करतो.
विराट कोहलीने दिलेले हे चॅलेंज पंतप्रधान मोदींनी स्वीकारले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हटलेय, विराटचे चॅलेंज मी स्वीकारतो. मी लवकरच याबाबतचा व्हिडिओ शेअर करुन फिटनेस चॅलेंज शेअर करेन. राठोड यांनी काही दिवसांपूर्वी 'हम फिट तो इंडिया' या हॅशटॅगने फिटनेस चॅलेंजला सुरुवात केली होती. ट्विटरवर अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडीओत ते आपल्या ऑफिसमध्येच वर्कआऊट करत असल्याचे दिसले होते. त्यांनी याबाबत आपल्याला पंतप्रधान मोदींनीकडून ऊर्जा मिळत असल्याचे म्हटले होते. जेव्हा मी पंतप्रधान मोदींना भेटतो तेव्हा त्यांच्याकडून प्रेरित होतो. त्यांच्यात जबरदस्त ऊर्जा आहे. ते दिवस रात्र काम करतात. संपूर्ण भारत फिट व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. त्यांच्यामुळेच मी प्रेरित होऊन हा व्हिडिओ बनवलाय.