Assembly Elections 2018 : सिद्धूंकडून काँग्रेसच्या नेतृत्वाचं कौतुक, भाजपचं खोचक नामकरण

सिद्धू उवाच, भाजप म्हणजे....   

Updated: Dec 11, 2018, 11:48 AM IST
Assembly Elections 2018 : सिद्धूंकडून काँग्रेसच्या नेतृत्वाचं कौतुक, भाजपचं खोचक नामकरण  title=

मुंबई : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगाणा या राज्यांमध्ये घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणूकांचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. अनेक मतदार संघांचे कलही येण्यास सुरुवात झाली आहे. एकंदरच मतदार राजाने दिलेला कौल पाहता भारतीय जनता पक्षाच्या प्रतिष्ठेला अनेक काही राज्यांमध्ये धक्का पोहोचला असून आता या पक्षाला आत्मचिंतन करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया काही नेतेमंडळींनी दिली आहे. 

काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी या निकालांचं स्वागत करत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली आहे. 'राहुल गांधी हे पहिल्यापासूनच सर्वांना आपल्या सोबत घेऊन पुढे आले आहेत. ते माणुसकीचं एक मूर्तिमंत उदाहरण आहेत. येत्या काळात भारताचं, आपल्या देशाचं भवितव्य ज्या हातांमध्ये असणार आहे ते हात अतिशय बळकट आहेत', असं ते म्हणाले. 

काँग्रेसने भाजपला मागे टाकत पुन्हा एकदा देशाच्या राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याचविषयी काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांना ज्यावेळी त्यांच्या प्रतिक्रियेविषयी विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी भाजपाचं खोचक शब्दांमध्ये नामकरण केलं. 

'गिरे तो भी टांग उपर' म्हणजेच जीटीयू हेच भाजपचं  नवं नाव आहे, असं म्हणत सिद्धू यांनी सत्ताधारी पक्षावर टीकास्त्र सोडलं. त्यांची ही प्रतिक्रिया पाहता आता भाजप कार्यकर्ते त्यावर कसे व्यक्त होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास एकंदरच निकालाचे कल पाहता परिस्थिती कधीही बदलू शकते हेसुद्धा नाकारता येणार नाही.