जयपूर : राजस्थान विधानसभा निडवणूक निकालात काँग्रेसला बहुमताचा कौल मिळालेला दिसतोय. एक्झिट पोलमध्येही काँग्रेसच सत्तेत येणार अशी स्पष्ट चिन्हं दिसत होती. त्यामुळेच ११ डिसेंबर रोजी संपूर्ण निकाल हाती येण्याच्या अगोदरच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाची शर्यत सुरू झाली. माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सचिन पायलट यांच्यात मुख्यमंत्रीपदाची चुरस रंगणार असं दिसतंय. त्यामुळेच, या दोघांच्या टीमही लॉबिंगसाठी चांगल्याच सक्रीय झाल्यात.
राजस्थान विधानसभा निवडणूक २०१८ निकाल : इथे क्लिक करा
गहलोत आणि पायलट या दोघांनीही मुख्यमंत्रीपदाबाबत सावध प्रतिक्रिया दिलीय. पक्षाचे अध्यक्ष मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेतील, असं अशोल गहलोत आणि सचिन पायलट या दोघांनीही मीडियाशी बोलताना म्हटलंय. परंतु, या दोन्ही नेत्यांच्या जवळची मंडळी मात्र आमदारांशी संपर्क साधण्यात व्यस्त झालेत.
अधिक वाचा : सचिन पायलट आहेत तरी कोण?
शुक्रवारी मतदान पूर्ण होण्यापूर्वीच माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत दिल्लीत दाखल झाले होते. तर सचिन पायलटही शुक्रवारी रात्री उशिरा दिल्लीत पोहचले. मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसचे दोन गट सक्रिय झाल्याचंच दिसून येतंय... आता मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडतेय, याची उत्सुकता अनेकांना लागलीय.