PPF आणि सुकन्या समृद्धी गुंतवणूकरांना मिळणार खूशखबर, व्याजदरात इतक्या टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता

तुम्ही पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, एनपीएस किंवा किसान विकास पत्र या सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Updated: Sep 20, 2022, 01:27 PM IST
PPF आणि सुकन्या समृद्धी गुंतवणूकरांना मिळणार खूशखबर, व्याजदरात इतक्या टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता title=

PPF Interest Rate:  तुम्ही पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, एनपीएस किंवा किसान विकास पत्र या सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकार 30 सप्टेंबर रोजी सुकन्या समृद्धी योजना (SSY) आणि पीपीएफ (PPF) च्या व्याजदरात बदल करण्याची अपेक्षा आहे. अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या व्याजदरात वाढ होणार आहे. महागाईची पातळी कमी करण्यासाठी आरबीआयने गेल्या काही दिवसांपासून रेपो दरात (RBI Repo Rate) वाढ केली होती. बँकांनी व्याजदरात वाढ केल्यामुळे सप्टेंबरच्या तिमाहीत बचत योजनांवर अधिक व्याज मिळण्याची शक्यता आहे. व्याजदरात केलेले बदल 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू केले जातील. आरबीआयने (RBI) तीन वेळा रेपो दरात 1.40 टक्क्यांनी वाढ केली आहे.

अल्पबचत योजनांवरील व्याजाचे सरकार दर तीन महिन्यांनी पुनरावलोकन करते. या पुनरावलोकनादरम्यान, व्याजदर वाढवायचे, कमी करायचे की स्थिर ठेवायचे याचा निर्णय घेतला जातो. हे व्याजदर वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय अर्थ मंत्रालय घेते. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात रेपो रेट पुन्हा 25 ते 35 बेस पॉइंट्सने वाढण्याची शक्यता आहे. पण सरकारने बचत योजनांवरील व्याजात कोणताही बदल केलेला नाही. अशा परिस्थितीत सरकार या वेळी अल्पबचत योजनांवरील व्याजात वाढ करेल, अशी अपेक्षा आहे. 

दहा दिवसांनी म्हणजेच 30 सप्टेंबर रोजी बचत योजनांवरील व्याजाचे पुनरावलोकन केले जाईल. हा आढावा ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या तिमाहीसाठी घेतला जाणार आहे. व्याजदरात 60 ते 70 बेसिस पॉइंट्सने वाढ होण्याची शक्यता आहे. अल्पबचत योजनेवरील व्याजदरात बऱ्याच काळापासून कोणताही बदल झालेला नाही.

सध्या पीपीएफवर वार्षिक 7.1% दराने व्याज मिळते. याशिवाय सुकन्या समृद्धी योजनेत (SSY) गुंतवणूक करणाऱ्यांना 7.6% वार्षिक परतावा दिला जात आहे. तर नॅशनल सेविंग्स रेकरिंग डिपॉजिट अकाउंटमध्ये 5.8% परतावा मिळतो. तर किसान विकास पत्रावरील व्याजदर 6.9 टक्के आहे.